March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.14) – मुलामुलींमध्ये भेदभाव करणे हा कायद्याने गुन्हा आहे. तो थांबवण्यासाठी कायद्यात तरतूद आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी फक्त शासनच नव्हे तर नागरिकांनी सुद्धा प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्या परिसरात बालविवाह सारख्या घटना घडत असल्यास त्यास प्रतिबंध करणे आपली जबाबदारी आहे. असे आवाहनात्मक प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी तुर्काबाद (खराडी) येथे गुरुवारी 14 ऑगस्ट रोजी केले.


तुर्काबाद ग्रामपंचायतच्या वतीने गुरुवारी 14 ऑगस्ट रोजी ‘कन्या सन्मान दिवस’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित होते. याप्रसंगी अंकित यांनी तुर्काबाद जिल्हा परिषद शाळेत आयोजित राज्यस्तरीय कोळीगीत, डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा जे बक्षीस वितरण करून मार्गदर्शन केले.

यावेळी ते म्हणाले की, मुलामुलींमध्ये जन्मापासूनच भेदभाव केला जात असल्याच्या अनेक घटना घडतात. त्यामुळेच मराठवाड्यात मुलींचे प्रमाण कमी आहे. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी ‘कन्या सन्मान दिवस’ अशा विविध कार्यक्रमातून जनजागृती करण्यात येत आहे.

मुला-मुलींमध्ये भेदभाव न करता त्यांना शिक्षणाच्या समान संधी द्याव्यात. विज्ञान, गणित इंजिनिअरिंग हे तीन विषय देशाच्या भौतिक विकासासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. यात मुलींची संख्या खूप कमी आहे. ती वाढण्याची गरज आहे. या संधी मुलींना मिळवून देण्यासाठी शाळांनी विविध उपक्रम, मार्गदर्शन शिबिर राबवले पाहिजे. तसेच पालकांनीही मुलींना विविध क्षेत्रात करिअर करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. असेही या कार्यक्रमात अंकित म्हणाले. प्रथम गंगापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या समुपदेशक डॉ. वैशाली मांदळे यांनी मुलींच्या आरोग्य विषयक तसेच एडवोकेट अनंत खवले यांनी महिला, मुलींबाबतच्या कायदेविषयक मार्गदर्शन केले.


कार्यक्रमास गट विकास अधिकारी सुहास वाघचौरे, सहाय्यक अक्षय भालेराव, गटशिक्षणाधिकारी अरविंद कापसे, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल सखदेव, विद्या दीक्षित, तुर्काबादच्या सरपंच कल्पना संदीप पाटेकर, उपसरपंच सुदर्शन प्रेमभरे, तुर्काबादचे ग्रामपंचायत अधिकारी पुंडलिक पाटील, ग्रामपंचायत सदस्य शेख ईसा, राधा संदीप पानकर, सईदा हबीब पठाण, लिंबेजळगावचे ग्रामपंचायत अधिकारी एन एल रावते, जिकठाणचे ग्रामपंचायत अधिकारी एस एन पल्हाड, केंद्रीय मुख्याध्यापक केशव देसले, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुदाम गायकवाड, पोलीस पाटील रामहरी पाटेकर, कल्याणराव पाटेकर, शालेय समितीचे अध्यक्ष नितीन नाडे, बापू कोठावदे शिल्पा चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. अमरसिंह चंदेल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *