वाळूजमहानगर, (ता.20)- वाळूज जवळील मुर्शिदाबाद येथील घर फोडून चोरट्याने 27 एप्रिल रोजी सोने चांदीच्या दागिण्यांसह रोख रक्कम केली होती. या प्रकरणातील एका अट्टल चोरट्यास अटक करून त्याच्याकडून दहा ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वाळूज परिसरातील मुर्शिदाबाद येथील बद्रीनाथ मोरे हे कुटुंबियासह बाजूलाच असलेल्या नवीन घरी झोपायला गेले होते. सकाळी उठल्यानंतर त्यांना आपल्या घराचे कुलूप तुटलेले दिसले. यावेळी चोरट्यांनी लॉक तोडून स्टीलच्या डब्यात ठेवलेले दोन तोळे सोन्याचे दागिने व पस्तीस हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल 27 एप्रिल रोजी लंपास केला होता. प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी गोपनीय माहिती काढून उत्तम उर्फ बंडू सिताराम मोरे यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने तोंड उघडले. चोरी केलेल्या मुद्देमालापैकी दहा ग्राम वजनाचा सोन्याचा नेकलेस पोलिसांना काढून दिला आहे. ही कारवाई उपनिरीक्षक अजय शितोळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कारभारी देवरे, पोलीस नाईक सतीश हंबर्डे, पोलीस अंमलदार सुखदेव कोल्हे, विजय पिंपळे, सुधाकर पाटील, श्रीकांत सपकाळ, नितीन धुळे, तुषार सोनवणे यांनी केली.