वाळूजमहानगर, ता.24- राज्यस्तरीय कामगार केसरी आणि कुमार केसरी कुस्ती स्पर्धा यंदा 9 ते 11 फेब्रुवारी रोजी हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. राज्य/राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या नियमांप्रमाणे व मुंबई शहर तालीम संघाच्या सहकार्याने या स्पर्धा होणार असून कुस्ती सामने मॅटवर खेळवले जातील.
महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या नोंदित कंपन्या, कारखाने आदी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या लिन नंबर (LIN) धारक कामगार व त्यांच्या पाल्यांना या स्पर्धेत भाग घेता येणार आहे. इच्छुक कुस्तीगिरांनी 30 जानेवारी पर्यंत कार्यक्रम शाखा, हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे प्रवेशिका सादर कराव्यात. स्पर्धेच्या प्रवेशिका, नियमावली यांची माहिती मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळांवर आणि मंडळाच्या राज्यातील सर्व विभागीय व गट कार्यालयांत तसेच कामगार कल्याण केंद्रात उपलब्ध आहेत.
कामगार केसरी आणि कुमार केसरी किताब पटकवणाऱ्या कुस्तीगिरांना पारितोषिक रकमेसह चांदीची गदा, मानाचा पट्टा व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येईल. कामगार केसरी कुस्ती स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 75 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 50 हजार रुपये, तृतीय पारितोषिक 35 हजार रुपये व उत्तेजनार्थ पारितोषिक 20 हजार रुपये आहे. कामगार पाल्यांसाठी आयोजित कुमार केसरी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 51 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 35 हजार रुपये, तृतीय पारितोषिक वीस हजार रुपये व उत्तेजनार्थ पारितोषिक 10 हजार आहे. तसेच विविध 5 वजनी गटात सामने होणार असून विजेत्यांना 25 हजार ते 10 हजारांची पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धेत जास्तीतजास्त कुस्तीगिरांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन मंडळाचे कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे.
