
वाळूजमहानगर, ता.12 (बातमीदार) – लोणावळ्याची सहल उरकून पुण्याहून औरंगाबाद मार्गे जालनाकडे जाणाऱ्या एका खाजगी शिकवणीच्या ट्रॅव्हल बसचा अपघात होऊन विद्यार्थी व शिक्षकांसह 7 जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी (ता.11) रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास ईसारवाडी फाटा येथे झाला. जखमीतील सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जालना येथील सौदागर कोचिंग क्लासेस मधील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची सहल पश्चिम महाराष्ट्र, कोकणाकडे गेली होती. शेवटचा टप्पा लोनावळा येथील सहल उरकून हे सर्वजण
मिनी ट्रॅव्हल्स बस ( एम एच 20, डी डी -0700) ने औरंगाबाद मार्गे जालना कडे जात होते. ही बस वाळूज परिसरातील इसारवाडी फाट्यावर येताच बसने समोरील ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रॅव्हल्स मधील विद्यार्थ्यांसह शिक्षक मिळून 7 जण जखमी झाले. यातील जखमी रेश्मा देशमुख (वय 25 वर्ष), रेहाना शेख (वय-14 वर्षे), गंगाला सौदागर (वय 35 वर्षे) व आदित्य गायकवाड (वय 16 वर्षे) सर्व रा. जालना यांच्यावर संजीवनी हॉस्पिटल गंगापूर येथे तर ए. आर. खिल्लारी यांनी घाटी मेडिकल चौकीतून कळविले की, कृष्णा संतोष शेलार (वय 16 वर्ष), प्रथमेश कुंदळे (वय- 13 वर्षे), जारा ईस्माईल खान (वय 18 वर्षे) सर्व रा. राहुरनगर जालना यांना शेख रमीस व जया खान यांनी घाटीत दाखल केले. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून या अपघाताची नोंद वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सखाराम दिलवाले व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख करीत आहे.
