
वाळूजमहानगर (ता.19) – मंदिराच्या परिसरात व उघड्यावर, रस्त्यावर मासे, बोंबील झिंगे विक्री करण्यास मनाई करत मंदिराचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासंदर्भात सांगण्यासाठी गेलेल्या नागरिकांना मासे विक्रेत्याने आरेरावी करत तोडण्याची, कापण्याची भाषा केल्याने मासे विक्रेता व नागरिकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. मात्र पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला. हा प्रकार रविवारी (ता.19) रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बजाजनगर येथे घडला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बजाजनगर येथील मोहटादेवी मंदिर ते सिडको वाळूज महानगरकडे जाणाऱ्या सिडकोच्या रस्त्यावर श्री लक्ष्मीपती बालाजी मंदीर प्रवेशद्वार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास जाणाऱ्या रस्त्यावर अवैधरित्या मासे, झींगे, बोंबील आदींची विक्री चालू आहे. या ठिकाणी दर्शनास येणाऱ्या भाविकांची नेहमी गर्दी असते. भाविकांच्या रस्त्यातच उघड्यावर मासे विक्री होत असल्याचा प्रकार सुरू असल्याने त्यांना त्यांचे दुकान दुसरीकडे हलवण्यास विनंती केली असता, वादविवाद, शिवीगाळ, करत मारण्याची, कापण्याची धमक्या देत असल्याची तक्रार नागरिकांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांनीकडे मंगळवारी (ता.14) रोजी केली होती. रविवारी (ता.19) रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास याच मुद्द्यावर मासे विक्रेता व नागरिकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. या लोकांना येथून काढावे व मंदीर परीसर व स्मारकाजवळ होणाऱ्या गर्दी व दुर्गंधीपासुन देवस्थान परीसर दुर्गंधी मुक्त व स्वच्छ ठेवण्यास मदत करावी. अशी मागणी नारायणरावजी कंठे, दिवाकर सेटटी, प्रेम गालफाडे, प्रेम विजयवर्गीय, भालचंद्र नागाळे, विनोद मालवी, गोपाल शर्मा, ओम गरड, कुणाल गायकवा, कार्तीक गिरासे, सौरभ बालाजी, श्रीकृष्ण कुलकर्णी, रजिश पवार, सुभाष जाधव, महेंद्रसिंग खंडाळकर, सुरेश जाधव आदींची उपस्थिती होती.
