
वाळूजमहानगर, (ता.22) – गावातील ओळखीच्या असलेल्या एका इसमाला महिलेने फोन करून घरी बोलावून घेतले. त्यानंतर बाहेरून आलेल्या नातेवाईकांनी त्याला बेदम चोपले. वडगाव (को.) येथे 13 जानेवारी रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात रविवारी (ता.21) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,
चापानेर ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर येथील गौतम रामदास गायकवाड (44) हा म्हाडा कॉलनी, ए एस. क्लब जवळ राहतो. त्याच्या गावातील सुनिता बागुल यांनी त्याला फोन करुन बोलविल्याने तो सुनिता बागुल राहत असलेल्या गट नं. 7 मथुरानगर, वडगाव (कोल्हाटी) येथे 13 जानेवारी रोजी 12.15 वाजेच्या सुमारास गेला होता. तो सनिता बागुलच्या घरात असतांना अंदाजे 1 वाजेच्या सुमारास संतोष सातदिवे, वाल्मीक बागुल हे बाहेरुन आले व लोखंडी रॉड, लाथाबुक्याने तसेच कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे सुनीता बागुल यांनीही मारहाण करण्यास विरोध केला. परंतु ते काहीएक ऐकत नव्हते. संतोष सातदिवे, वाल्मिक बागुल, संकेत बागुल यांनी त्याला घराबाहेर ओढुन आणले व घरात चोर घुसल्याचे सांगुन पोलीसांना बोलावले. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या गौतम गायकवाड याला पोलिसांनी रुग्णवाहिकेतून उपचारार्थ घाटीत दाखल केले होते. या प्रकरणी आरोपी संतोष सातदिवे, वाल्मिक बागुल व संकेत बागुल यांच्या विरुद्ध रविवारी (ता.21) रोजी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
