
वाळूजमहानगर, (ता.9) – महिलांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सबलीकरण करणे आवश्यक आहे. स्त्रियांच्या सबलीकरणांमध्ये शिक्षण हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर स्त्री पुरुष समानतेसाठी आपल्या घरातून सुरुवात होणे महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या डॉ. रूपाली हिवरकर यांनी महिला सबलीकरण आणि महिलांच्या व्यथा यावर मार्गदर्शन केले.
बजाजनगर येथील दगडोजीराव देशमुख महाविद्यालय येथे अंतर्गत तक्रार निवारण समिती व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष व्याख्यान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन बुधवारी (ता.8) रोजी करण्यात आले. यावेळी त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवराज धबडगे होते. याप्रसंगी जिल्हा रुग्णालय, चिकलठाणाचे डॉ. जगदीश टेकाळे, डॉ. महेश मरकड, डॉ. अमोल काकड, अनिता जाधव, आरती धाटकर, शिल्पा टाकणकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. जगदीश टेकाळे, डॉ. अमोल काकड व डॉ. महेश मरकड यांनी महिलांचे मानसिक आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले. आरोग्य तपासणी अंतर्गत उपस्थितांचे बीपी, शुगर व डेंटल चेकअप करण्यात आले. महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आरोग्य तपासणी शिबिराचा फायदा घेतला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय सांभाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अनुजा कंदी, सूत्रसंचालन डॉ. नीलिमा काळे यांनी तर आभार डॉ.सरला दवंडे यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
