March 23, 2026

वाळूजमहानगर, ता.14- राष्ट्रीय युवा दिवसाचे औचित्य साधून, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ, त्र्यंबकेश्वर येथील पिठाधीश परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांच्या आदेशानुसार बजाजनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून स्वामी महाराजांच्या पालखी मिरवणूक सोहळ्याचे आयोजन 12 जानेवारी रोजी करण्यात आले होते.


यात महिला व पुरुष सेवेकऱ्यांच्या सोबतच विविध वेशभूषा करून बाल सेवेकरी पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. परिसरातील रस्त्यावर सडा, रांगोळी टाकून रहिवाशांनी पालखीला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सडा-रांगोळी व स्वामी नाम घोषाने परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले. सकाळी 8.30 वाजता बजाजनगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रातून पालखी निघून परिसरात सर्वत्र भ्रमंती करून बजाजनगर येथील सर्वांचे उर्जा स्थान असलेले शिवप्रतिष्ठान याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देऊन दुपारी 2.30 वाजता पालखी परत सेवा केंद्रात आली. 21 जानेवारी मंगळवार रोजी परमपूज्य गुरुमाऊलींच्या पावन सान्निध्यात आयोजित श्री चक्रराज श्री यंत्र पुजन व अतिरुद्र पठण सोहळ्याच्या अनुषंगाने प्रचार प्रसार पालखी दरम्यान करण्यात आला. बारावे ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र घृष्णेश्वर, वेरूळ जवळील दिवशी गावच्या हद्दीत परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांच्या पावन सान्निध्यात सकलकार्य-सिद्धिकारक श्री चक्रराज श्री यंत्र पुजन व हजारो शिवलिंगावर अतिरुद्र पठण तथा भव्य दिव्य राष्ट्रीय महासत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाला येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी चोख व्यवस्था करण्यात येत आहे. लाखो भाविकांसाठी भव्यदिव्य मंडप उभारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पार्किंग व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, आरोग्य व्यवस्था व प्रसाद व्यवस्थेचे उत्तम नियोजन करण्यात येत आहे. कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील भाविक सेवेकऱ्यांनी अगोदरच रेल्वे आरक्षण, बस आरक्षण आदी तयारी सुरू केली आहे. परिसरातील सर्व भाविक सेवेकऱ्यांनी या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन नियोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *