February 5, 2026

वाळुज महानगर, (ता 9) – निष्काळजीपणामुळे 13 वर्षीय निष्पाप मुलाचा बळी गेला. शिवाय विजेच्या अनेक समस्यानी शेतकऱ्यांना ग्रासले. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी तुर्काबाद महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणत मोर्चा काढून महावितरणवर शुक्रवारी 9 जानेवारी रोजी चांगलेच ताशेरे ओढले. यावेळी मोर्चेकर्‍यांनी इंजिनिअर शेख यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करत तीव्र रोष व्यक्त केला.

याप्रसंगी विविध घोषणांनी परिसर दणाणला होता.
याबाबत माहिती अशी की, तुर्काबाद येथील अंकुश कचरु जाधव यांचा 13 वर्षीय मुलगा ओमकार याला मंगळवारी 6 जानेवारी रोजी लोम्बकळणाऱ्या विद्युत तारांमुळे इलेक्ट्रिक शॉक लागून तो मृत्युमुखी पडला. ही दुर्घटना इंजिनिअर शेख मुफीद शेख मकसुद यांच्या हलगर्जीपणामुळे घडली. त्यामुळे त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. या मागणीसाठी तुर्काबाद (खराडी) येथील गावकऱ्यांनी शुक्रवारी 9 जानेवारी रोजी तुर्काबाद महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला.

यावेळी गावकऱ्यांनी महावितरणच्या भोंगळ कारभाराचा पाढा वाचत तुर्काबाद सब स्टेशन हद्दीतील अनेक गावांमध्ये महावितरणचा अत्यंत बेजबाबदार, निष्काळजी व धोकादायक कारभार सुरु असल्याचे म्हटले आहे. या भागातील अनेक गावांतर्गत डी.पी. संचांचे फ्युज बॉक्स पूर्णपणे जीर्ण झाले असून ते उघड्या अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी विद्युत पोल झुकलेले व मोडकळीस आलेले आहेत.

विद्युत तारा अत्यंत खाली लोंबकळलेल्या असून नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला व शेतकरी यांचा जीव धोक्यात आहे. पावसाळा. वादळी वारा किंवा साध्या स्पर्शामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची मोठी शक्यता आहे. अत्यंत गंभीर बाब म्हणजे, महावितरणचे ठेकेदार शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता, विश्वासात न घेता थेट शेतजमिनीत विद्युत पोल उभे करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होत असून त्यांच्या हक्कांवर सरळ सरळ अन्याय केला जात आहे. हा प्रकार बेकायदेशीर, मनमानी व शेतकरीविरोधी आहे. महावितरण प्रशासनाने याबाबत आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही न केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व रोष निर्माण झाला आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण व संबंधित अधिकाऱ्यांवर राहील.

अशा आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या –
तुर्काबाद सब स्टेशन अंतर्गत सर्व गावांतील डी.पी. संच व फ्युज बॉक्स तात्काळ दुरुस्त व सुरक्षित करावेत. वाकडे झालेले व मोडकळीस आलेले विद्युत पोल त्वरित बदलण्यात यावेत. लोंबकळणाऱ्या व धोकादायक विद्युत तारा त्वरित उंचीवर घेण्यात याव्यात. शेतकऱ्यांच्या शेतात पोल उभारताना लेखी परवानगी व नुकसान भरपाईशिवाय कोणतेही काम करू नये, विनापरवानगी सुरू असलेले काम थांबवावे. संबंधित ठेकेदार व दोषी अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश देण्यात यावेत. जर या निवेदनाची गंभीर दखल घेऊन तात्काळ कार्यवाही केली नाही, तर महावितरण कार्यालयासमोर तीव्र जनआक्रोश आंदोलन, रास्ता रोको, तसेच वरिष्ठ कार्यालये व न्यायालयात दाद मागण्यात येईल. असाही इशारा यावेळी देण्यात आला आहे. याप्रसंगी विविध घोषणांनी परिसर दणाणला होता.

यावेळी योगेश पाटेकर, वैजिनाथ पाटेकर, पवन पाटेकर, दिलीपसिंग राजपूत, रतन बत्तीशे, आशिष गवळी, दतू गायकवाड, अंकुश जाधव, बाळू पाटेकर, दत्तू चौधरी, कैलास तीनगोटे, अशोक मढुरे, आकाश प्रेमभरे, सचिन जाधव, हिरा भाई, गणेश काळे, खंडु राहटवाड, अफरोज शेख, गणेश जाधव, रवी पानसकर, विनोद पानकर, बाबासाहेब राहटवाड, नानासाहेब राहटवाड, नानासाहेब सामसे आदींसह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

     सविस्तर मोर्च्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी

          युट्युब चॅनलला सबस्क्राईब, शेअर  करा 

दरम्यान वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी गावकऱ्यांच्या समस्याविषयी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शेवटी गावकऱ्यांनी वाळूज महावितरण कार्यालयाचे उपअभियंता विशाल साळवे यांना पोलिसांच्या उपस्थितीत लेखी निवेदन देऊन तात्काळ कार्यवाही करण्याची मागणीही केली. दरम्यान पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक रमेश राठोड, राजेश वाघ, पोलीस अंमलदार कारभारी देवरे, पांडुरंग शेळके, अमोल गायकवाड आदींनी मोर्चादरम्यान चोख बंदोबस्त ठेवला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *