February 24, 2025

वाळूजमहानगर, (ता.6) – शेतकरी कामगार यांच्या विरोधातील महाराष्ट्र द्वेषी, गद्दार व मिंद्धे सरकारला त्यांची जागा दाखवा, आणि मशाल चिन्हावर मतदान करून महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना लोकसभेत पाठवा. असे आवाहन युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वाळुज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे आयोजित जाहीर सभेत सोमवारी (ता.6) रोजी केले.
महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ रांजणगाव (शेणपुंजी) येथे सोमवारी (ता.6) रोजी रात्री 9 वाजता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा घेण्यात आली.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकार यांच्यावर ताशेरे ओढत इंडिया आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील उद्योगधंदे कशा पद्धतीने गुजरातला नेले, अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्तांना मदत करण्यासाठी भाजपा सरकार कधीही धावून आले नाही. उलट आमचे सरकार असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, दिलेला शब्द आम्ही पाळला. शेतकरी विरोधी हे सरकार बलात्कारासारख्या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालतात. त्यांच्या मागे उभे राहून त्यांचा प्रचार करतात. अशा गद्दार व खोके सरकारला तुम्ही मतदान करणार आहात का?. गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात मोदी सरकारने जनतेला त्रास देण्याचे काम केले. जम्मू काश्मीर मधील 370 कलम हटवले. त्याचे आम्हीही स्वागत केले. परंतु तेथील दहशतवाद अद्यापही संपलेला नाही, कालच एअर फोर्सच्या जवानावर हल्ला झाला. पेपर फुटी व सरकारी नोकरी याविषयी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की,

ज्या मिनिटाला इंडिया आघाडीचे सरकार येईल, या मिनिटाला आपण असा कायदा करू की, जो पेपर फोडेल, त्याला आपण फोडल्याशिवाय राहणार नाही. जे परीक्षेत पास होतात त्यांना सुद्धा बोली लावल्या जाते की, तुला या पदावर जायचे की त्या पदावर. अशी बोली या मिंधे, गद्दार सरकारकडून लावली जाते. निवडून येण्याची शास्वती नसल्याने लदाख मध्ये, जम्मू-काश्मीरमध्ये भाजप निवडणूक लढण्यास तयार नाही. आज पंजाब, दिल्ली, बिहार कोणत्याही राज्याचा आढावा घ्या. तेथे सुद्धा इंडिया आघाडीचे सरकार येत आहे. आणि त्यामुळे तुम्ही मला सांगा परिवर्तनाच्या बाबतीत महाराष्ट्र मागे राहू शकतो का?. आपण सुद्धा मागे राहणार नाही. महाराष्ट्रातील 48 पैकी जास्तीत जास्त जागा इंडिया आघाडी त्याच येणार असा ठाम विश्वासही आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवला.


याप्रसंगी विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, उमेदवार तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे, उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, लक्ष्मणभाऊ सांगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गंगापूर -खुलताबाद तालूकाध्यक्ष ज्ञानेश्वर निळ, कृष्णा पाटील डोणगावकर, तालूकाप्रमुख दिनेश मुथा, बाळासाहेब गायकवाड, जिल्हा परिषदेचे वाळुज येथील माजी अर्थ व बांधकाम सभापती मनोज जैस्वाल, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विठ्ठल कोळेकर, गंगापूर पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर बोरकर, घाणेगावचे माजी पंचायत समिती सदस्य संतोष गायकवाड, माजी उपसभापती संपत छाजेड, उद्योजक अमोल लोहकरे, जोगेश्वरीचे माजी सरपंच प्रवीण दुबिले, राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठल कांबळे, काँग्रेस पार्टीचे नवनाथ मनाळ, सागर शिंदे, युवा सेना उपतालुका अधिकारी रमेश आरगडे, जोगेश्वरी ग्रामपंचायत सदस्य मन्साराम बिलवाल, उपतालुकाप्रमुख मनोज पिंपळे, रांजणगाव येथील विभाग प्रमुख कैलास हिवाळे, वाळुज विभागप्रमुख बाळासाहेब चनघटे, शहर प्रमुख बाबासाहेब आरगडे, विश्वनाथ थोरात, देवेंद्र चव्हाण, तुर्काबाद येथील बाळासाहेब शेळके यांच्यासह वाळुज, रांजणगाव, जोगेश्वरी, घाणेगाव, कमळापूर, लिंबे जळगाव, लांझी, पिंपरखेडा, तुर्काबाद, येसगाव, दिघी, अंबेलोहोळ, लासुर स्टेशन, पोळ रांजणगाव, शिल्लेगाव येथील महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *