वाळुज महानगर, (ता.6)- शेतकरी वर्गाला पिक कर्ज नूतनीकरण, व्याज परतावा तसेच शासनाच्या प्रोत्साहनपर योजनेचे महत्व पटवून सांगण्यासाठी व त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेचे 5 ते 15 जून दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेदरम्यान संपूर्ण मराठवाड्यात तब्बल 50 ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या दरम्यान तब्बल 2 हजार नियमित पिक कर्ज धारकांचा सत्कार तसेच संपूर्ण यात्रेदरम्यान 2 हजार झाडांचे वृक्षारोपण देखील बँकेमार्फत करण्यात येणार आहे.
ही यात्रा 5 जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथून सुरु होऊन 2 वेगवेगळ्या मार्गांनी नांदेड या ठिकाणी एकत्र येणार असून 15 तारखेला नांदेड ला समारोपाचा कार्यक्रम घेण्यात येईल. एक टीम छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड तसेच दुसरी टीम छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर ते नांदेड या मार्गाने मार्गक्रमण करणार असून त्या दरम्यान एटीएम मशीनचे प्रात्यक्षिक तसेच आर्थिक समावेशन, डीजीटल साक्षरता आणि सामाजिक सुरक्षा योजनांबद्दल जनजागृती देखील बँकेमार्फत करण्यात येईल.
या यात्रेदरम्यान एक कार्यक्रम वाळूज शाखेअंतर्गत टेंभापुरी या गावी 8 जून 2024 रोजी दुपारी 3.30 वाजता घेण्यात येणार आहे. कार्यक्रमास वाळूज, गंगापूर व शेंदूरवादा या शाखांतील सर्व कर्मचारी, ग्राहक तसेच क्षेत्रीय कार्यालय व मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड व महाव्यस्थापक दत्तात्रय कावेरी हे थेट संवाद साधुन उपस्थिताना मार्गदर्शन करणार आहेत. बँकेचे सर्व ग्राहक, प्रतिष्ठित नागरिक, बचत गटातील महिला तसेच संबंधित शासकिय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी व ग्रामस्थ या सर्वांनी आपापल्या गावात येणाऱ्या महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेत मोठ्या संख्येने सामील होण्याचे व त्याचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत करण्यात आले आहे.