वाळूजमहानगर (ता.18) – मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चर (मसिआ) आणि सागर गॅसेस यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या बॅडमिंटन कोर्ट येथे विविध वयोगटात आयोजित पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेचा समारोप पुरस्कार वितरणाने आमदार संजय शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव सचिन मुळे, सागर गॅसेसचे मनीष मित्तल, गरवारेचे संचालक दिपक जोशी, राजेंद्र जंजाळ, सिद्धांत शिरसाट, मासीआचे उपाध्यक्ष अनिल पाटील, सचिव राहुल मोगले, मासीआ स्पोर्ट्स कमिटीचे समन्वयक मंगेश नीटूरकर यांची उपस्थिती होती.
30 वर्ष या गटात डॉ. रोहित बंग – रोहित निर्माळकर आणि जावेद खान पठाण आणि अतुल कुलकर्णी या जोडीने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. पण ते अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरले. अंतिम सामन्यात हिंगोलीच्या सचिन चौधरी आणि अनिल शिंदे या जोडीने औरंगाबादच्या निखिल मुथा व सारंग बागला जोडीचा 2- 1 ने पराभव करून विजेतेपद पटकावले.
40 वर्ष वयोगटात जितेंद्रकुमार जैन – हरिहर मणियार तसेच सदाशिव पाटील -दयानंद पाटील या जोडीने उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला होता. पण अंतिम फेरीत ते पोहनचू शकले नाहीत. अंतिम फेरीत प्रशांत जोशी- आशिष वाघमारे या जोडीने अतिशय रोमहर्षक सामन्यात डॉ. खटावकर आणि जावेदखान पठाण जोडीचा पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
50 वर्ष वयोगटात संदीप फितवे व राजू उगीले तसेच विशाल जैस्वाल व अनिल बोर्डे या जोडीने अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी मेहनत केली. पण ते आपले स्थान बनवू शकले नाहीत. अंतिम सामना रंगला तो गुर्मीतसिंग मथारु – अजय खंडेलवाल विरुद्ध डी. डेव्हिड आणि ईश नारंग या जोडीमध्ये. पण बाजी मारली ती गुर्मीतसिंग मथारु – अजय खंडेलवाल या जोडीने. तरुणांनाही लाजवेल अश्या अविर्भावात या जोडीने खेळ खेळून खिताब आपल्या नावे करून घेतला. या स्पर्धेत महिला संघांनी पुरुषांच्या तोडीसतोड खेळ करून उपस्थितांचे मन जिंकली. संपूर्ण स्पर्धा अतिशय चुरशीची झाली. त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तोबा गर्दी केली होती. महिला गटात रक्षिका देशमुख व श्रेया पिंपरकर या जोडीने अतिशय उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम सामन्यात राजश्री पाटील व बेनझीर जाधव या जोडीवर मत करून विजेतेपद पटकावले. सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मासीआ स्पोर्ट्स कमिटीचे समन्वयक मंगेश नीटूरकर, डी डेव्हिड, मिलिंद कुलकर्णी, अजिंक्य पथरीकर, मनीष अग्रवाल, डॉ. वंदना काबरा आदींनी परिश्रम घेतले.