
वाळूजमहानगर, (ता.3) – वाळूज औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या गट नंबर मधील उद्योजकांना विद्युत पुरवठ्याबाबत विविध समस्या सोडविण्यासाठी मसिआने सातत्याने पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणून आणि वाळूज औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या करोडी उपकेंद्रला 33 के व्ही छावणी फिडरवरुन जोडण्यात आला. त्यामुळे वडगाव को. गट नंबर 65 व 71 आणि करोडी येथील उद्योजकांना अखंडित विजपुरवठा मिळणार आहे. 
या कार्यक्रमाचे उद्घाटन महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदवले, मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे, अधिक्षक अभियंता प्रविण दरोली यांच्यासह मसिआचे अध्यक्ष अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
वाळूज औद्योगिक क्षेत्रालगत गट नंबर मध्ये कारखाने असलेल्या उद्योजकांना विद्युत पुरवठ्याच्या विविध समस्या मागील 10 वर्षापासून होत्या. अखंडित विजपुरवठा मिळत नसल्यामुळे येथील उद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे येथील उद्योजकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा. यासाठी मसिआने संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यावर पर्याय म्हणून करोडी उपकेंद्राला होणारा विद्युत पुरवठा हा आता 33 केव्ही छावणी फीडरवर जोडण्यात आला. शिवाय नविन विजवाहिनी टाकण्यात आली. 
त्यामुळे उद्योजकांना अखंडित विजपुरवठा होणार आहे. उद्घाटनानंतर मसिआच्या वाळूज येथे सर्व अधिकारी आणि मसिआचे पदाधिकारी आणि गट नंबर मधील उद्योजकांची बैठक घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष अनिल पाटील यांनी या विद्युत पुरवठ्यामुळे उद्योजकांना दिलासा मिळणार असल्याचे सांगून एमएसईडीसीएलच्या अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करून यापुढे देखील असेच सहकार्य रहावे. अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी डॉ. मंगेश गोंदवले यांनी देखील औद्योगिक विकासाच्या दृष्टीने आवश्यक ते सहकार्य नेहमीच असेल असे आश्वासन दिले. कार्यक्रमास उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड, सचिव कमलाकर पाटील, प्रसिद्धी प्रमुख अब्दुल शेख यांच्यासह कार्यकारिणी सदस्य राहुल मोगले, शरद चोपडे, दुष्यंत आठवले, तसेच महावितरणचे कार्यकारी अभियंता विष्णु ढाकणे, सचिन उकंडे, राहुल चोरडिया, सचिन देशमुख, नीलेश कुंडे, संदीप अग्रे, श्रीकांत भांगे, विजय शिर्के, नारायण धाइत, अशोक मोहरुत, पंढरीनाथ देवकर, शामराव सोमवंशी यांच्यासह उद्योजकांची उपस्थिती होती.
