वाळुज महानगर (ता.24) – मराठा आरक्षणासाठी प्रत्येक जण पेटून उठला असून जो तो आपापल्या परीने आरक्षण मिळण्यासाठी मोर्चे, उपोषण असे वेगवेगळे आंदोलन करीत आहे. वाळूज परिसरातील रामराई गावाने त्यापुढेही एक पाऊल पुढे टाकत गावाच्या वेशीजवळ फलक लावून पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. या फलकावर लिहिले आहे ‘चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण हेच आमचे लक्ष’.
शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारा मराठा समाज आजघडीला मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. भारत माझा देश आहे. आणि सारे भारतीय माझे बांधव आहे. तर मग वेगळी वागणूक मराठा समाजाला का?.
असा प्रश्न मराठा समाजासमोर उभा आहे. केवळ आरक्षण नसल्यामुळे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मोठी रक्कम मोजावी लागते. टक्केवारीसुद्धा चांगले घेतली. तरीही पुढील शिक्षणासाठी आरक्षण आडवे येते. परिणामी मराठा समाज आज अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत आहे. त्याला कारणीभूत फक्त राजकीय पक्ष आणि त्याचे नेते हेच आहेत.
आणि म्हणूनच वेशी जवळ फलक लावून ‘चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण हेच आमचे लक्ष’. असा फलक लावून रामराई गावात राजकीय पुढार्यांना गाव बंदी करण्यात आली आहे.