
वाळूज महानगर, (ता.19) – मराठवाड्यातील जनतेला खऱ्या अर्थाने तीन स्वातंत्र्यासाठी लढा द्यावा लागला. त्यामध्ये ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी, मराठी भाषिकांच्या स्वतंत्र राज्यासाठी व मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी. निजामाच्या अमानुष निरंकुश सत्तेच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी, मराठवाड्यातील जनता पेटून उठली, आणि निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्ध लढा यशस्वी केला. त्यामुळे 17 सप्टेंबर 1948 रोजी हैद्राबाद संस्थानचे विलीनीकरण भारतात करण्यात आले.असे मार्गदर्शनपर प्रतिपादन इप्का लॅबोरेटरीजचे डॉ व्यंकट मैलापुरे यांनी केले.
कामगार कल्याण भवन बजाजनगर छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ 17 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी प्रमुख पाहुणे इप्का लॅबोरेटरीज ली,चे मानवसंसाधन विभाग प्रमुख डॉ. व्यंकट मैलापूरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी उद्योजक मनोज कळम, अमृत मराठे, एकनाथ पवार, बालाजी पांचाळ, खराडे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थिती होती. 
डॉ. मैलापूरे बोलताना म्हणाले की, भारत हा 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला. त्यावेळी भारत हा विविध संस्थांमध्ये विभागलेला होता. त्यावेळी 565 पैकी 562 संस्थांनानी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. परंतु हैद्राबाद, जुनागड आणि कश्मीर ही संस्था ने भारतात विलीन झाली नव्हती. या संस्थांनाही स्वतःला वेगळे घोषित केले. येथे निजामाची हुकूमशाही चालू होती.
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात अनंत भालेराव, गोविंद भाई श्रॉफ, विजेंद्र काबरा, दिगंबराव बिंदू, रवीनारायण रेड्डी, देविशिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, बाबासाहेब परांजपे आदींनी या लढ्यात महत्त्वाचे कार्य केले. तसेच मराठवाडातील अनेक जिल्ह्यातून जनतेने या लढ्यात आपला सहभाग नोंदवत महत्त्वाची कामगिरी निभावून हैद्राबाद संस्थानाच्या गुलामगिरीतून मराठवाड्याला मुक्तता करून दिली.
यावेळी मराठवाडा विभाग छत्रपती संभाजीनगरचे सहा.कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले. कामगार कल्याण भवन बजाजनगरचे कल्याण निरीक्षक विजय अहिरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वरी ताले, केंद्र उपसंचालिका नीलिमा गावंडे, ग्रंथपाल संगीता पवार, शिक्षिका सुषमा रेखाते, वनिता मसने, सीता पोहीवाले तसेच सुरक्षा रक्षक सुरेश बिराडे, दत्तू आवारे, छोटू बाविस्कर यांनी परिश्रम घेतले.
