March 25, 2026

वाळूजमहानगर, ता.13 – मंदिर हे हिंदू समाजाचे शक्ती केंद्र व सेवा केंद्र असून मंदिरांच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या हिंदू समाजातील लोकांसाठी संपूर्ण देशभर रुग्णोपयोगी साहित्य केंद्र, वैद्यकीय उपचार केंद्र, अभ्यासिका व वसतिगृह यासारखे विविध प्रकारचे सेवा कार्य उभे राहावेत. यासाठी प्रत्येक मंदिराने आपल्या उत्पन्नातील दहा टक्के भाग सामाजिक कार्यासाठी दिल्यास मंदिराचे समाजातील स्थान उंचावण्यास मदत होईल. असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषद मंदिर अर्चक पुरोहित आयामाचे क्षेत्र संपर्कप्रमुख अनिल सांबरे यांनी केले.

बजाजनगर येथील श्री.साईबाबा मंदिर ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषद मंदिर अर्चक पुरोहित आयाम संचालित कै.बाळकृष्ण नाईक रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात अनिल सांबरे हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक मनोज कदम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वाळूज जिल्हा संघचालक अनिल पाटील, श्री साईबाबा ट्रस्टचे सचिव साहेबराव पाथ्रीकर, मंदिर आर्चक पुरोहित आयाम प्रांत संपर्कप्रमुख राजीव जहागीरदार, विभाग संपर्क प्रमुख योगेश पाठक उपस्थित होते.

श्री साईबाबा मंदिर ट्रस्ट बजाजनगरच्या प्रांगणात रविवारी (ता.8) रोजी सायंकाळी 5 वाजता झालेल्याका या कार्यक्रमात सांबरे पुढे म्हणाले की, भारत हा मंदिरांचा देश आहे. जगात सर्वात अधिक मंदिरे भारतात आहेत. मंदिरांनी त्यांच्याकडे असलेल्या जागेचा उपयोग करून विविध प्रकारची सेवाकार्य सुरू केल्यास समाजही अशा कामासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात देणगी देऊ शकतो. यासाठी मंदिरांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन आणि कै. बालकृष्ण नाईक रुग्णोपयोगी साहित्य केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. विश्व हिंदू परिषद मंदिर आयामाचे प्रांत संपर्क प्रमुख राजीव जहागिरदार यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी जहागिरदार यांनी प्रास्ताविकात देवगिरी प्रांतात चाललेल्या मंदिर अर्चक पुरोहित आयामाच्या कामाची माहिती दिली आणि श्री साईबाबा मंदिर ट्रस्टने सेवा कार्य सुरू करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबाबत विश्वस्तांचे अभिनंदन केले आणि या साहित्य सेवा केंद्रातून गरजू रुग्णांना अत्यंत अल्प दरात व्हीलचेअर, वॉकर, कुबड्या, फोम गादी, वॉकिंग स्टिक सलाईन स्टॅन्ड, नेब्युलायझर, कमोड चेअर, फॉलोअर बेड, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व युरीन पॉट आदी प्राप्त होईल असे सांगितले.

याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वाळूज जिल्हा संघचालक अनिल पाटील श्री साईबाबा मंदिर ट्रस्ट सचिव साहेबराव पाथरीकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
कै. बालकृष्ण नाईक यांची पुतणी मेधा नाईक यांनी बाळकृष्ण नाईक यांच्या कार्याविषयी माहिती दिली. यानंतर नाईक कुटुंबियांच्या सामाजिक कार्यातल्या योगदानाबद्दल श्रीमती विद्याताई नाईक यांचा सत्कार करण्यात आला. लोकार्पण सोहळ्याचे सूत्रसंचालन कविता जगदाळे तर आभार मंदिर आयामाचे वाळूज प्रखंड सहप्रमुख संजीव तायडे यांनी मानले. महर्षी पाणिनी कन्या वेदपाठ शाळेतील मुलींनी म्हटलेल्या शांती पाठानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या लोकार्पण सोहळ्यासाठी संपूर्ण नाईक कुटुंबीय, लक्ष्मण माने, दामोदर घुगे, कैलास चव्हाण, रामकृष्ण चव्हाण, ज्ञानेश्वर लबडे, देवानंद पवार, शहाजी जगदाळे यांच्यासह बजाजनगर परिसरातून आणि संभाजीनगर शहरातून मोठ्या संख्येत नागरिक बंधू-भगिनी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *