
वाळुज महानगर, (ता.4) – रांगोळी काढून एका मटक्यावर मृत्यूचा संदेश देणारा मजकूर लिहून अगरबत्ती, लिंबू, मीठ, कुंकू वाहून पूजा करून करणी, भानामती, भुताटकी आणि जादूटोणा केल्यासारखा प्रकार सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आला. यामुळे बजाजनगर परिसरात रविवारी 4 जानेवारी रोजी मोठी खळबळ उडाली आहे.

वाळूज परिसरातील बजाजनगर- वडगाव (कोल्हाटी) रोडवरील भोंडवे पाटील शाळेसमोर एक धक्कादायक प्रकार समोर आला. काही अज्ञात व्यक्तींनी भर रस्त्यात जादूटोणा सदृश वस्तू आणि पूजा केलेले मडके ठेवून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले. हा प्रकार सोशल मीडिया रील बनवण्यासाठी किंवा खोडसाळपणा म्हणून केला असावा. अशी शंका वर्तविण्यात येत आहे. मात्र यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संशयाचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण आले होते. ही बाब समजताच बजाजनगर येथील अनेकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ पोलीसांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत तो संशयास्पद प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. भानामती आणि भुताटकीला साजेशी ही समस्यास्पद वस्तू तिथून हटवण्यात आली आहे. याप्रकरणी भोंडवे पाटील स्कूलच्या वतीने व्यवस्थापक नामदेव बनकर यांनी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
असा होता मटक्यावरील मजकूर –
याबाबत भोंडवे पाटील स्कूलचे अध्यक्ष हनुमान भोंडवे यांनी सांगितले की शाळेच्या गेट समोर हा प्रकार सकाळी उघडकीस आला. मटक्याची पूजा करून तेथे अगरबत्ती, लिंबू, मीठ, कुंकू टाकलेले होते. ओलांडून गेला तर मृत्यू होईल, पाठीमागेवळून पाहिले तर मरून जाशील. भूत प्रेत येथेच्छ! आसा मजकूर त्यावर लिहिलेला होता.
अंधश्रद्धेला बळी पडू नका…….
अफवांवर विश्वास ठेवू नका, अंधश्रद्धेला बळी पडू नका, जागरूक राहा. करणी, जादूटोणा, भानामती आणि भुताटकी अशा कोणत्याही गोष्टीला घाबरू नका. हा केवळ खोडसाळपणा असू शकतो. अंधश्रद्धेपेक्षा आपल्या सुरक्षेला महत्त्व द्या. असे आवाहन भोंडवे पाटील पब्लिक स्कूलचे हनुमान भोंडवे, रोहित खैरे, अशोक लगड, पंडित नवले, किशोर उमाळे, विशाल खंडागळे यांनी केले आहे.
