March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.26) – बजाजनगर येथील भोंडवे पाटील पब्लिक स्कूलचा 4 था वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा रविवारी (ता.23) व सोमवारी ता.24 एप्रिल 2023 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित यावर्षीच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. ‘नवरस व मानवी जिवन मूल्ये’ या संकल्पनेवर आधारित दोन दिवस वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम शाळेसमोरील भव्य प्रांगणात सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत सादर करण्यात आला.

या नवरसात शांत रस, करूण रस, वीर रस, हास्य रस, बिभत्स रस, भयानक रस, रौद्र रस, शृंगार रस, अद्भुत रस या नवरसांचे सादरीकरण करण्यात आले. याचबरोबर विविध मानवी जीवन मूल्यांचे सादरीकरण शाळेच्या चिमुकल्यांनी नृत्य व सुंदर अशा नाटीकांच्या माध्यमातून केले. या मानवी जीवन मूल्यांमध्ये मैत्री, आनंद, स्वातंत्र्य, प्रेरणा, बचत, सुरक्षितता, जबाबदारी, गटकार्य, कौटुंबिक प्रेम, भक्ती – शक्ती इत्यादींवर आधारित नृत्य, गीत व नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. या समारंभाचे अध्यक्षस्थान शाळेचे अध्यक्ष, तथा शिवसेना तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे यांनी भूषवले. तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक सिद्धांत शिरसाट, चित्रपट दिग्दर्शक शिव कदम, कवी गणेश घुले, लेखक प्रा.बळीराम हावळे, कवी प्रा.डॉ.दासू वैद्य यांना आमंत्रित करण्यात आले होते. सर्व अतिथींनी आपल्या मनोगतात शाळेचे तसेच विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. गणेश वंदना करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक रवि दाभाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात झालेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा विषय घडामोडींचा अहवाल विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सादर करण्यात आला. त्यानंतर शाळेतील संगीत विभागाने संगीताचे प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांना प्रभावित केले. त्यानंतर ‘नवरस व मानवी मूल्ये’ या संकल्पनेवर आधारित नृत्य व नाटकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नवरसांचे प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे यांनी आभार मानले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करत आपल्यातील सुप्त गुणांना असेच जागरूक ठेवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमास शाळेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे, सचिव मीनाक्षीताई भोंडवे, मुख्याध्यापक रवी दाभाडे, समन्वयक राणी सावंत, समन्वयक गहेना शादीजा यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *