
वाळूज महानगर, (ता.1) – बजाजनगर येथील भोंडवे पाटील शाळेत नवीन ‘इको क्लब’ ‘plant for mother’ ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानांतर्गत विद्यार्थी, त्यांची माता आणि धरणीमाता यामधील नाते मजबूत होण्यासाठी शाळेत वृक्षारोपण मोहीम मंगळवारी 29 जुलै रोजी राबवण्यात आली.
यादरम्यान शालेय परिसरात ‘झाडे लावूया, वसुंधरा वाचवूया’ असा संदेश देणारी रॅली काढण्यात आली. यावेळी शाळेतील इयत्ता 5 वी 10 तील सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरणास हातभार लावणार्या विविध वृक्षांचे मोफत वाटप करण्यात आले. प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थी व त्यांची माता या ‘इको क्लबच्या’ सदस्य म्हणून सहभागी झाल्या. या माध्यमातून शालेय परिसर, घर परिसर, सार्वजनिक ठिकाणी वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सर्व विद्यार्थी व माता पालकांना पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी झाडांचे महत्त्व समजावून सांगितले. त्यासोबतच शाळेत ऊर्जा संवर्धन, कचरा व्यवस्थापन याविषयी देखील जागरूक राहण्याची शपथ घेतली.
यावेळी शाळेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे, शाळेचे मुख्याध्यापक अविराज काळे, उपमुख्याध्यापिका शर्मिष्ठा दत्ता, मिडल स्कूल प्रमुख राणी सावंत, प्राथमिक विभाग प्रमुख गेहना शादिजा यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
