
वाळूज महानगर, (ता.28) – बजाजनगर येथील भोंडवे पाटील पब्लिक स्कूल या शाळेत रोबोटिक्स लॅबचे उद्घाटन शुक्रवारी (ता.28) रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले. या उद्घाटनाला प्रमुख अतिथी म्हणून मॅनेजमेंट कन्सल्टंट राज रतन पाटील व महाराष्ट्र राज्य इनफिनिटी लर्नर प्रमुख राहुल राजा हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांचे स्वागत व परिचय करण्यात आला. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक रवी दाभाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मनीषा वारुळे व भावना औताडे यांनी रोबोटिक्स लॅबची कार्यपद्धती व महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी रोबोटिक्सविषयी माहिती विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून व रोबोटिक नृत्याचे सादरीकरण करून उपस्थितांसमोर मांडली.
या कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे, संचालिका मीनाक्षीताई भोंडवे, मुख्याध्यापक रवी दाभाडे, उपमुख्याध्यापिका शर्मिष्ठा दत्ता, समन्वयक राणी सावंत, गना शादीजा, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश फटाले व प्रज्ञा मॅडम यांनी केले तर आभार शाळेच्या उपमुख्याध्यापिका दत्ता मॅडम यांनी मानले. राज्यगीताने व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
नवनवीन उपक्रमात अग्रेसर –
बजाजनगर येथील भोंडवे पाटील पब्लिक स्कूल ही शाळा म्हणजे नवनवीन उपक्रमांच्या बाबतीत नेहमी अग्रेसर असणारी एकमेव शाळा. त्याचाच एक भाग म्हणजे शाळेत नव्यानेच अंतर्भूत केलेली रोबोटिक्स लॅब होय. 
“आर्टिफिशियल इंटेलिजन्स व रोबोटिक्स लॅब ही विद्यार्थ्यासाठी काळाची गरज आहे. कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर पुस्तकीय ज्ञानाबरोबरच आपल्याकडे अवांतर ज्ञान व कौशल्य असणे खूप गरजेचे आहे. असे प्रतिपादन राज पाटील यांनी केले. 
“अत्याधुनिक रोबोटिक्स व आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब असणारी संभाजीनगर मधील भोंडवे पाटील पब्लिक स्कूल ही पहिलीच शाळा आहे. रोबोटिक्स लॅबचे उपयोजन सध्याच्या काळात खूप गरजेचे आहे. स्पष्टीकरण राहुल राजा यांनी केले. 
“रोबोटिक्स लॅब ही विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची भूक शमवण्यासाठी पूरक साधन ठरेल. सध्याच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे आपण लक्षात घेऊन नवनवीन क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी अद्ययावत ज्ञानाचा साठा आपल्याजवळ असणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन भोंडवे पाटील पब्लिक स्कूलचे अध्यक्ष हनुमान भोंडवे यांनी केले.
