February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.27) – बजाजनगर येथील भोंडवे पाटील पब्लिक स्कूलमध्ये 75 वा अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरासह, देशभक्तीच्या घोषणा देत भव्य प्रभात फेरी काढून व ध्वजवंदन करून मोठ्या उत्साहात शुक्रवारी (ता.26) रोजी साजरा करण्यात आला.


कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अरुण शितोळे व डॉ. प्रतिभा शितोळे होते. तिरंगी झेंड्याला सलामी देऊन राष्ट्रगीत व राज्यगीताचे तसेच ध्वजगीताचे गायन करण्यात आले. देशभक्तीपर स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेतील एनसीसी छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य, सूर्यनमस्कार व योगा यांची प्रात्यक्षिके करत सर्वांचे लक्ष वेधले. काही विद्यार्थ्यांनी इंग्लिश, हिंदी व मराठीतून मनोगत व्यक्त केले.

प्रमुख अतिथींच्या हस्ते पालकांसाठी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे, शैक्षणिक वर्षात 100 टक्के उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांचे तसेच एनसीसी छात्र सेनेतील उत्कृष्ट छात्रांचे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर प्रमुख अतिथीनी मनोगत व्यक्त केले. या शाळेसारखी नाविन्यपूर्ण शाळा मी पहिल्यांदाच बघून प्रभावित झालो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या ठिकाणी केला जातो. आपल्या मुलांना कधीच कमी लेखू नका. असे आवाहन शितोळे यांनी पालकांना केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष हनुमान भोंडवे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, प्रजासत्ताक दिनाचे स्मरण करताना या दिनाने आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत, त्यांचा योग्य वापर आपण राष्ट्राच्या जडणघडण्यासाठी केला पाहिजे. देशाच्या विकासासाठी आपण नेहमी कटिबद्ध असावे. असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वरी जोशी व आदित्य इंगळे यांनी केले. कार्यक्रमास शाळेचे सचिव मीनाक्षी भोंडवे, मुख्याध्यापक रवी दाभाडे, उपमुख्याध्यापिका शर्मिष्ठा दत्ता, समन्वयक राणी सावंत, गहेना शादीजा, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *