वाळूजमहानगर, (ता.12) – भूमिगत गॅस पाईप लाईनचे काम करताना निष्काळजीपणा झाल्याने जमिनीतील पाईप चक्क वाळुज येथील नागरिकांच्या घरात निघाले. परिणामी पाईपलाईन मधील मलबा, दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरात आले. शिवाय घरं व दुकानांना तडे गेले. याबाबत नागरिकांनी रोष व्यक्त केल्याने विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी बुधवारी (ता.11) रोजी प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळवून दिली.
पुणे औरंगाबाद दरम्यान महामार्गाच्या एका बाजूने भूमिगत गॅस पाईपलाईन काम सुरू आहे. हे काम करताना संबंधित ठेकेदारांकडून निष्काळजीपणा झाल्याने बाबासाहेब पारधे, रावसाहेब काकडे, लक्ष्मण पवार, भागवत जाधव, शिवाजी काकडे, सुनील गंगवाल यांच्या दुकानासह अनेकांच्या घरांच्या भींतींना तडे गेले. रात्री अचानक भूकंपा सारखा आवाज आला आणि घरं व दुकानांच्या भिंती हलू लागल्या. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान गॅस लाईनचे पाईप वर आले. त्यातून मलबा, दुर्गंधीयुक्त घाण पाणीही जमा झाले. त्यानंतर लक्षात आले की, भूमिगत गॅस पाईपलाईनमुळे हा सर्व प्रकार घडला.
म्हणून पीडीत संबंधीत रहिवाशांनी पाईपलाईनचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला घटनेचा जाब विचारला. तेव्हा कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी हा प्रकार ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती मनोज जैस्वाल यांच्या कानावर टाकला. त्यानंतर माहिती माजी सभापती मनोज जैस्वाल यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निदर्शनास आणून दिल्याने त्यांनी तात्काळ वाळूज येथे येऊन नुकसान झालेल्या घरं व दुकानांची पाहणी केली. तसेच कंत्राटदाराला बोलावुन नुकसान ग्रस्तांना आर्थिक मदत मिळवून दिली. यावेळी मनोज जैस्वाल यांच्यासह उपसरपंच योगेश आरगडे, माजी सभापती ज्ञानेश्वर बोरकर, प्रफुल्ल मालाणी, बाबासाहेब पारदे, महेश पवार, अनिल सोनवणे, सौरभ वैद्य, रामकिसन पवार, अमोल खैरणार,अशोक काकडे आदींची उपस्थिती होती.
