वाळूजमहानगर, (ता.30) – माजी सैनिकांच्या भुखंडावर अतिक्रमण करण्याच्या कारणावरुन जोगेश्वरी येथे महिलांमध्ये 27 मे रोजी मोठा राडा झाला. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून एका माजी सैनिकासह दोन महिलांना बेदम मारहाण करणा-या 5 जणासह त्यांच्या साथीदाराविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, महेश रामचंद्र तांबे (57, रा.भावसिंगपुरा) हे माजी सैनिक असून त्यांनी 2006 मध्ये संगिता वाघमारे यांच्याकडून 1856 स्केअर फुटाचा भुखंड खरेदी केला आहे. आठवडाभरापुर्वी बौध्द पोर्णिमेच्या दिवशी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास माजी सैनिक तांबे यांच्या भुखंडावर गावातील काही महिला व नागरिकांनी महापुरुषाची मुर्ती बसवून या भुखंडावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. या अतिक्रमणाबाबत गावातील सुमनबाई चौतमल यांनी माजी सैनिक तांबे यांना माहिती दिल्याने त्यांनी जोगेश्वरीत येऊन पाहणी केली असता त्यांना त्यांच्या भुखंडावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसले. त्यामुळे चौकशी केली असता या ठिकाणी सुवर्णा पंडीत, माया बिरारे, अंजली कर्डक, सुभाष कर्डक व निळकंठ आमराव यांनी अतिक्रमण केल्याची माहिती मिळाली. यानंतर भुखंडमालक तांबे यांनी प्रार्थना व वंदन करुन त्या महापुरुषाची मुर्ती काढुन टाकली होती.
अतिक्रमणाचा फलक काढतांना राडा –
दरम्यान, सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास महेश तांबे हे सुमनबाई चौतमल व कविता साबळे यांच्या अतिक्रमणाच्या ठिकाणी गेले असता या ठिकाणी फलक काढण्यावरुन वाद झाला. या वादात सुवर्णा पंडीत, माया बिरारे, अंजली कर्डक यांनी समुनबाई चौतमल व त्यांची मुलगी कविता साबळे या मायलेकींनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या दोघींनी मारहाण होत असल्याचे दिसताच भुखंडमालक तांबे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मारहाण करणा-या महिला तसेच सुभाष कर्डक व निळकंठ आमराव यांनी तांबे यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. या प्रकरणी महेश तांबे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी सुवर्णा पंडीत, माया बिरारे, अंजली कर्डक, सुभाष कर्डक, निळकंठ आमराव व त्यांच्या साथीदाराविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक इंगोले हे करीत आहेत.
मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल –
जोगेश्वरी येथे झालेल्या या महिलांच्या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत महिला एकमेकींना मारहाण करताना दिसत आहे. ही मारहाण होत असतांना घटनास्थळी अनेक नागरिक उपस्थितीत असतांनाही त्यांनी बघ्याची भुमिका घेतल्याचे दिसुन येत आहे.