वाळूजमहानगर, (ता.12) – भरधाव जाणारी मर्सडीज कार व वळण घेणारी आयशर ट्रक यांच्यात भिषण अपघात होऊन मर्सिडीजचा चक्काचूर झाला. पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाळूजजवळ शुक्रवारी (ता.12) रोजी दुपारी झालेल्या या अपघातात तीन जण जखमी झाले. सुदैवाने एअर बॅग उघडली त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मर्सडीज कार (एमएच 12, यु डब्ल्यु -3393) ही भरधावपणे पुण्याकडून छत्रपती संभाजीनगरकडे येत होती. तर याच मार्गाने येणारा आयशर ट्रक (एम एच 20, सीटी -3096) हा येत असताना बडवे कंपनीत जाण्यासाठी वळण घेत होता. त्यामुळे भरधाव असलेली कार आयशर ट्रकला पाठीमागून जोरात धडकली. हा अपघात इतका भीषण होतात की, मर्सिडीज कारचा संपूर्ण चक्काचूर होऊन कार मधील चालकासह तीन जण गंभीर जखमी झाले.
सुदैवाने अपघात होताच कार मधील एअर बॅग उघडली. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली. शुक्रवारी (ता.12) रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघाताची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारार्थ रवाना केले. ट्रक चालक दीपक साबळे रा. वाळूज याला पोलिसांनी आयशरसह ताब्यात घेतले आहे.
