February 5, 2026


वाळूज महानगर, (ता.21) – कंपनीमध्ये तोडफोडीचे काम करत असताना अचानक भिंत कोसळल्याने एक मजूर भिंती खाली दबून ठार झाला. मात्र सुदैवाने दोन जण या घटनेतून बालंबाल बचावले. ही दुर्दैवी घटना शनिवारी (ता.21) रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील एफ -94, येथील ओमकार कंपनीत काम करण्यासाठी काचीपुरा झोपडपट्टी, तिसगाव (मूळ रा.पोहे टाकळी ता.पाथरी जि.परभणी) येथील करण भास्कर शिंदे, अर्जुन भास्कर शिंदे व आकाश लक्ष्मण शिंदे असे असे तीन जण गेले होते. तेथे हे तिघेजण भिंत पाडण्याचे काम करीत असताना अचानक भिंत कोसळली. या भिंतीखाली आकाश शिंदे (19) हा दाबून जागीच ठार झाला. मात्र सुदैवाने करण व अर्जुन या घटनेतून बालंबाल बचावले. शनिवारी (ता.21) रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घटनेनंतर आकाश शिंदे याला भास्कर शंकर शिंदे व सुरेश रामा शिंदे यांनी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.

याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या घाटी मेडिकल चौकीतून पोलीस नाईक सी.बी.सानप यांनी दिलेल्या खबरीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश तारव करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *