
वाळूजमहानगर, (ता.19) -शेजारी शेजारी राहणाऱ्या दोन भावांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्याने एका भावाने दुसऱ्या भावाचे दगडाने डोके फोडले. तसेच भावाच्या पत्नीने त्याच्या पत्नीलाही मारहाण केली. ही घटना मंगळवारी (ता.17) रोजी जोगेश्वरी येथे रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जोगेश्वरी येथील अंबादास ओंकार जगताप वय-35 वर्षे व्यवसाय-ट्रॅक्टर चालक यांनी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, तो व त्याची पत्नी वंदना, मुली आरती, प्रिती असे राहण्यास आहे. आम्ही एक कुत्री पाळलेली असुन ती आमचे घरीच राहते. शेजारी लहान भाऊ भाऊसाहेब ओंकार जगताप वय-33 वर्षे हा त्याच्या कुटुंबासह राहण्यास आहे. मंगळवारी (ता.17) रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास मी कामावरून घरी आलो. व पत्नी वंदना हिस कुत्रीस दुध पाजले नाही का, असे विचारले. त्यावरुन शेजारी राहणारा लहान भाऊ भाऊसाहेब ओंकार जगताप याची पत्नी सिमा ही बाहेर आली व मला कुत्री का म्हटला? असे बोलून मला शिवीगाळ केली. त्यानंतर भाऊसाहेब हा घरातुन बाहेर आला व त्याने तेथे रस्त्यावर पडलेल्या दगडाने माझ्या डोक्यात मारले व माझी पत्नी वंदना ही भांडण सोडविण्यासाठी आली असता भाऊसाहेब याची पत्नी सिमाने शिवीगाळ करत वंदना हिस हाताचपटाने मारहान केली. या प्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
