वाळूज महानगर– वाळूज परिसरातील भांगसी माता गडावर श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरी महाराज यांच्या उपस्थितीत नवरात्रोत्सव, जपानुष्ठान सोहळ्याचे आयोजन सोमवार (ता.26) सप्टेंबरपासून मंगळवार (ता.4) ऑक्टोंबर पर्यंत करण्यात आले आहे.
या निमित्त नित्य नियम विधी, आरती, प्रवचन, योगासने आदींसह विविध कार्यक्रम होतील. उत्सवाची सांगता मिरवणूक, प्रवचन व महाप्रसादाने मंगळवारी (ता.4) ऑक्टोबर रोजी होईल. भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री स्वामी परमानंद गिरी महाराज यांनी केले आहे.
विविध कार्यक्रम –
जपानुष्ठानाव्यतिरिक्त दररोज सकाळी पाच ते सातपर्यंत विधी, आरती, प्रवचन व सायंकाळी सात वाजता परमानंद गिरी यांचे प्रवचन आश्रमात होईल. अनुष्ठानास बसणाऱ्या भाविकांनी आवश्यक साहित्यासह उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी 9823447607, 9923494901 किंवा 9422290333 यावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
असा आहे भांगसी माता गड –
वाळूज परिसरातील निसर्गरम्य परिसरात असलेल्या डोंगरावर भांगसी माता मंदिर आहे. नवरात्रात गडावर भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. गडाच्या शिखरावर म्हणजेच जमिनीपासून हजार फुटउंचीवर सासू सुनेचे कुंड आहे. या कुंडात बारमाही पाणी असते. “नाही केली भांगसी तर देवा काय सांगशी” असे भाविक म्हणतात. शिवाय वर्षातून एकदा भांगसी मातेच्या दर्शनासाठी पायी येतात. पायऱ्यांवरील शेड, गडाच्या पायथ्याशी हेमाडपंथी पशुपतयेश्वर मंदिर निर्माण कार्य, मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड आदी कामे गडावर प्रगतीपथावर आहेत. पायथ्याशी सुमारे 500 मुलांचे निवासी गुरुकुल आहे. विद्यार्थ्यांना गाईचे दूध मिळावे, यासाठी गोशाळा आहे. गुरू परंपरेतील संस्काराबरोबरच वैज्ञानिक शिक्षण गुरूकुलात विद्यार्थ्यांना देण्यात येते. गडावर विजेची व्यवस्था, मातेच्या गाभाऱ्यावर भाविकांच्या योगदानातून मंदिर, सभामंडपाची निर्मिती झाली आहे.