वाळूजमहानगर, (ता.15) – बजाजनगर येथील महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या भव्य ग्रंथ दिंडीने 44 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा शुभारंभ शनिवारी (ता.15) रोजी सकाळी मोठया उत्साहात झाला.
या ग्रंथदिंडीत असलेल्या पालखीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी रचलेली ग्रामगीता, ज्ञानेश्वरी ग्रंथ, संत तुकारामांची अभंग गाथा यासह कथासंग्रह, कादंबरी, बाल साहित्य आदि साहित्य ठेवण्यात आले होते. या दिंडीत संत गाडगेबाबांच्या वेशभूषेत ह भ प माधव महाराज सेनगावकर, श्री गुरुदेव सेवा मंडळ, सिद्धिविनायक गणपती मंदिर भजनी मंडळ, नारायणा मार्शल आर्ट च्या लाठीकाठी फिरणाऱ्या युवती, मोहटादेवी व गणपती मंदिर योगवर्गाचे साधक, वारकरी भजनी मंडळ, साईनाथ विद्यालय वाळूजच्या विद्यार्थ्यांसह विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सहभागी झाले होते. दिंडीच्या अग्रभागी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय राऊत, प्राचार्य डॉ. प्राचार्य राहुल हजारे, उपप्राचार्य संजय सांभाळकर यांच्यासह शेकडोंची उपस्थिती होती.