
वाळूज महानगर, (ता 9) – रिसेप्शन उरकून एका दुचाकीवर ट्रिपल सीट जाणाऱ्यांची दुचाकी दुभाजकाला धडकून घसरली. आणि विरुद्ध बाजूला रोडवर पडलेल्या एकाला भरधाव कंटेनरने चिरडले. या अपघातात एक जण जागीच ठार तर दोन जण जखमी झाले. हा अपघात लिंबेजळगाव येथील टोल नाक्यावर सोमवारी (ता.8) रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, लिंबे जळगाव येथील नातेवाईकांच्या घरून रिसेप्शन उरकून बिडकीन येथील तौफिक रफिक शेख, तालेब नसीर पठाण व अन्य एक असे तीन जण सोमवारी (ता.8) रोजी रात्री दुचाकी (एम एच 20, जी एफ -1651) वरून बिडकीनला जात होते. वाळूज जवळील नवनिर्माण ढाब्याजवळ त्यांची दुचाकी दुभाजकाला धडकून घसरली. आणि दुचाकी वरील तौफिक शेख हा विरुद्ध बाजूने जाऊन रोडवर पडला. आणि त्याचवेळी वाळूजकडून लिंबेजळगावकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनर (एच आर 58, बी – 1419) ने त्याला चिरडले. त्यात त्याचा मृत्यू झाला. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात तालेब पठाण व अन्य एक असे दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या विनामूल्य ॲम्बुलन्सचे पायलट संदीप त्रिंबके यांनी वाळूज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सखाराम दिलवाले यांच्या मदतीने अपघातातील जखमी व मयतास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तोफिक शेक वय 18 रा. बिडकीन याला तपासून मृत घोषित केले. या अपघाताची नोंद वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 
कंटेनर चालकास बदडले –
भरधाव जाणारी दुचाकी दुभाजकाला धडकली आणि एक जण दुभाजकाच्या पलीकडे विरुद्ध बाजूने जाऊन पडला. त्याचवेळी वाळूज कडून लिंबेजळगाव कडे जाणाऱ्या कंटेनरने त्याला चिरडले. त्यामुळे संतप्त जमावाने रोष व्यक्त करत कंटेनर चालकाला बदडले. अतिक इसरार रा. हरिद्वार उत्तराखंड असे या कंटेनर चालकाचे नाव आहे. सुदैवाने वाळूज पोलिसांनी तात्काळ धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
