
दोन ठार, एक जण गंभीर
भरधाव कारची दुचाकीला धडक,दोन ठार, एक जण गंभीर
वाळूजमहानगर – खुलताबाद येथील भद्रा मोरुतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या दुचाकीला भरधाव आलेल्या कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील तीन जणांपैकी दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात धुळे-सोलापूर महामार्गावरील शांताई पेट्रोलपंपाजवळ शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाला.
म्हसळुर ता.जि. बुलाढाणा (ह.मु. सिडको वाळूजमहानगर) येथील अक्षय परसराम सिनकर (25), विकास वाल्मीक सोनवणे (29) व अंकूश हरी पवार (19) हे तीन जण श्रावण शनिवारी निमित्त खुलताबाद येथील भद्रा मोरातीच्या दर्शनासाठी दुचाकी (एम एच 20,ईयु -1183) वरुन जात होते. त्यांची दुचाकी धुळे सोलापूर महामार्गावरील शांताई पेट्रोलपंपाजवळ येताच भरधाव आलेल्या कार (एम एच 28, ए झेड – 5426) च्या दुचाकीला पाठीमागुन जोराची धडक दिली. शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात तिघेही दुचाकीवरुन फेकल्या गेले. त्यातील एक जण कारच्या चाकाखाली आल्याने चिरडून तर दुसरा गंभीर जखमी होऊन ठार झाला. तीसरा अंकूश पवार हा जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बेशुध्दावस्थेत घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून अक्षय परसराम सिनकर (25), विकास वाल्मीक सोनवणे (29) यांना मृत घोषीत केले. तर अंकूश पवार हा किरकोळ जखमी असल्याने याच्यावर प्राथमिक उपचार करून घरी पाठवले.
दरम्यान वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अपघात करणारी कार ताब्यात घेतली असून चालक मात्र फरार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पागोटे यांनी सांगितले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.