वाळूजमहानगर, (ता.13) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथे एका भंगारच्या गोदामाला शुक्रवारी (ता.13) रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीचे लोट हवेत पसरल्याने रांजणगाव परिसरात धूरच धूर झाल्याचे दिसून आले. दरम्यान सतर्क नागरिकांच्या कर्तव्यदक्षतेमुळे अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग विझवली.
वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथे श्रीरामनगर नावाची वसाहत आहे. या वसाहतीत मोकळ्या जागेवर निसार छेदीलाल शेख रा. मुंबई याचे भंगारचे गोडाऊन होते. या गोडाऊन मधील अनेक भंगार त्याने विकले. मात्र उर्वरित प्लास्टिक, फ्रिज फॉर्म व अन्य केरकचरा तेथेच पडून होता. या गोडाऊनला शुक्रवारी (ता.13) दुपारी 3 वाजेच्या सुमारास आग लागली. पाहता पाहता धुराचे लोट हवेत पसरले आणि परिसरात धुरच धूर झाला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रांजणगाव येथील माजी उपसरपंच अशोक शेजुळ, अनिस शेख, बाबूलाल हिवाळे, रवींद्र जाधव, सुभाष हिवाळे, शंकर कानडजे आदींनी घटनास्थळी धाव घेत वाळूज अग्निशमन दलास पाचारण केले. सुमारे दोन तासाच्या परिश्रमानंतर ही आग विझवली. सुदैवाने यात कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.
