March 29, 2026

वाळूजमहा

वाळूज नगर, (ता.23) – परवाना नसतानाही दवाखाना थाटुन रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोन परप्रांतीय बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाच्या पथकाने कारवाई करून त्यांच्या दोन्ही दवाखान्यांना शील ठोकण्यात आले. दरम्यान शनिवारी (ता.23) रोजी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पश्चिम बंगाल येथील आरोपी शैलेंद्र नीतू दास (28) व संजय दिलीप मंडल (35) यांच्याकडे दवाखाना सुरू करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र नसतानाही त्यांनी वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे दवाखाना थाटला होता. याबाबतच्या तक्रारी नागरिकांनी केल्याने गंगापूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रंगनाथ काळुबा तुपे, सहायक गटविकास अधिकारी डॉ. स्नेहल शेलार, वाळूज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. योगिता निर्मळ, अन्न व औषधी विभागच्या औषध निरीक्षक अंजली मिटकर, विस्तार आरोग्य अधिकारी हिरामण गोरे,आरोग्य सहायक रामचंद्र निकम यांच्यासह वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या महिला पोहेकॉ. रेखा चांदे, पोकॉ.राहुल बंगाळे आदीच्या पथकाने शुक्रवारी रांजणगावातील श्रीकृष्ण नॅचरोपॅथीक व पार्वती नॅचरोपॅथीक या दोन रुग्णालयात छापा मारला.

या कारवाईत या दोन्ही रुग्णालयात शैलेंद्र दास व संजय मंडळ हे रुग्णावर उपचार करताना मिळून आले. त्यांच्याकडे वैद्यकीय पदवी, रुग्णालय नोंदणीची कागदपत्रे, परवाना नसल्याचे समोर आले. त्यामुळे शैलेद्र दास व संजय मंडळ यांना ताब्यात घेऊन दवाखान्यातील विविध प्रकारच्या औषधी तसेच रुग्णांना दिलेल्या औषधीच्या पावत्या, वैद्यकीय उपकरणे आदी साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.तुपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान शनिवारी (ता.23) रोजी आरोपींना गंगापूर न्यायालयात हजर केले असता आरोपींना सोमवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक इंगोले करीत आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *