March 24, 2026


वाळूजमहानगर (ता.24) – दोन दिवसापासून संशयास्पद रित्या उभी असलेली कार आढळून आल्याने वाळूज एमआयडीसी पोलिसांसह बॉम्बशोधक व नाशक पथकाची धावपळ उडाली. या संशयास्पद कारची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. हा प्रकार शुक्रवारी (ता.24) रोजी दुपारी समोर आला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज कमळापूर रोडवरील जोगेश्वरी शिवारात श्रीकृष्ण पेट्रोलियम हा एचपी चा पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपाच्या समोर दोन अज्ञात अनोळखींनी असेंट कार (एम एच 12, बी व्ही -9675) गुरुवारी (ता.23) रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास उभी केली. आणि तेथील कर्मचाऱ्यांना सांगितले की, 10 मिनिटात घेऊन जातो. दहा मिनिटं म्हणताम्हणता दोन दिवस झाले. तरीही या कारकडे कोणीही फिरके ना. त्यामुळे पेट्रोल पंप चालकाला संशय आला आणि त्यांनी या बेवारस कारची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल डी आर मते व भोटकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून त्यांनी सावध पवित्रा घेत या बेवारस कारची माहिती बॉम्ब शोधक व नाशक पथकाला दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून बॉम्बशोधक व नाशक पथकातील पोलीस उपनिरीक्षक भुमरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन कारची पाहणी केली.

मात्र सुदैवाने त्यात कोणतीही विस्फोटक वस्तू आढळली नाही. सुमारे चार तासाच्या या धावपळीनंतर पोलीस व पेट्रोल पंप चालकांनी सुटकेचा श्वास सोडला. आणि वाहतूक शाखेच्या मदतीने कार क्रेनच्या सहाय्याने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली.
गुन्ह्यात वापरल्याचा संशय
दरम्यान या कारबाबत मोबाईल ॲपवरून माहिती काढली असता असेंट कंपनीची पांढऱ्या रंगाची व काळा टप असलेली कार (एम एच 12, बी व्ही -9675) ही नागेश राज्योतीया रा. सरस्वती चौक, मुरारजी पेठ सोलापूर यांच्या मालकीची असल्याचे समजते. कुणीतरी अज्ञात आरोपींनी ही कार चोरून गुन्ह्यात वापरून येथे आणून सोडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *