
वाळूजमहानगर, (ता.18) -डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 14 एप्रिल रोजी निघालेल्या मिरवणुकीत वाद झाल्याने रागाच्या भरात बेपत्ता असलेल्या 21 वर्षीय तरुणाचा मृतदेह मंगळवारी (ता.18) रोजी सायंकाळी करोडी शिवारात आढळून आला. दरम्यान नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून तीन संशयीतावर आरोप करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घाणेगाव येथे मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत आनंदा अशोक बनसोडे व 21 याचा तीन जणांसोबत वाद झाला होता. यावेळी त्याला आरोपींनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. तेव्हापासून आनंदा बनसोडे हा तणावाखाली असल्याने तो बेपत्ता झाला होता. दरम्यान त्याचा मृतदेह करोडी शिवारातील एका विहिरीत मंगळवारी (ता.18) रोजी सायंकाळी आढळून आला. दरम्यान हा घातपाताचा प्रकार असून नातेवाईकांनी अविनाश दीपक काळे, दीपक दशरथ काळे व अजय भाऊसाहेब आंग्रे रा. घाणेगाव या संशयीतांवर आरोप केला आहे. विशेष म्हणजे 2018 मध्ये आनंदा बनसोडे यांच्या भावाचा सुद्धा याच आरोपींनी खून करून याच विहिरीत मृतदेह टाकला होता. असा आरोपही नातेवाईकांनी केला आहे.दरम्यान दौलताबाद पोलीस, तसेच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आनंदा बनसोडे या तरुणाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय घाटी येथे पाठवला आहे. सेवाविच्छेदनाच्या अहवालानंतरच या तरुणाच्या मृत्यूचे गुढ समोर येणार आहे.
पोलिसांवरही आरोप –
मिरवणुकीत वाद झाल्यानंतर तणावग्रस्त आनंदा बनसोडे हा बेपत्ता झाला. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत माहिती दिली. मात्र एमआयडीसी पोलिसांनी दखल घेतली नाही. असा आरोप मयत आनंदा बनसोडे यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
