वाळूजमहानगर ता.24 (बातमीदार) – वडगाव (को.) येथील वीस वर्षीय तरुण गेल्या चार दिवसापासून बेपत्ता होता. या तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत वडगाव (को.) येथील विहिरीत गुरुवारी (ता.24) रोजी सकाळी आढळून आला. त्याने आत्महत्या केली की, हा घातपात आहे. याबाबत पोलीस संभ्रमात आहे.
सौरभ ज्ञानेश्वर साळे (वय30), रा.वडगाव (कोल्हाटी) हा बजाजनगरातील हायटेक महाविद्यालयात बी.कॉम प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. सोमवारी (ता.21) रोजी तो वडगाव शिवारात गट क्रमांक 73 मध्ये असलेल्या शेतात वडिलांचं काम करत होता. दुपारनंतर तो शेतातून गेला होता. सांयकाळी उशिरापर्यंत सौरभ हा घरी न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र तो मिळून न आल्याने एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची खबर दिली होती. दरम्यान, त्याचा मृत्तदेह गुरुवारी (ता.24) रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठा विहिरीत तरंगताना नागरिकांना दिसून आला. माहिती मिळताच उपनिरीक्षक अशोक इंगोले, पोहेकॉ.राठोड यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतुन बाहेर काढला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून सौरभ साळे याच्या आत्महत्येचे कारण समजु शकले नाही.