वाळूजमहानगर (ता.26) – उसने घेतलेल्या पैशावरून मित्रासोबत वाद झाल्याने गुरुवारी (ता.23) पासून बेपत्ता झालेल्या 23 वर्षीय तरुणाचा कायगाव येथील गोदावरी नदी पात्रात रविवारी (ता.26) रोजी मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे वाळूज परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आशुतोष भास्कर पाथ्रीकर (बनसोड) वय 23 रा. सिडको वाळूज महानगर हा प्रदीप खुशालराव पाथ्रीकर यांच्या के पी कंट्रक्शनच्या कार्यालयात मदतनीस म्हणून काम करत होता. गेल्या तीन ते चार महिन्यापूर्वी अशुतोष याने त्याचा मित्र अक्षय शरद गावंडे यांच्याकडून घरगुती कामासाठी दोन लाख रुपये उसने घेतले होते. गुरुवारी (ता.23) रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आशुतोष हा प्रदीप पाथ्रीकर यांच्या के पी कंट्रक्शनच्या कार्यालयात मध्ये काम करत असताना तेथे अक्षय गावंडे हा त्याचे पैसे मागण्यासाठी आला होता. त्यावेळी आशुतोष त्याला म्हणाला की, सध्या माझ्याकडे पैसे नाही. मी तुला नंतर देतो. यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर आशुतोष पाथ्रीकर हा दुचाकी घेऊन बाहेर गेला होता. बराच वेळ झाला तरी तो घरी परत न आल्याने त्याचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. या प्रकरणी प्रदीप खुशालराव पाथ्रीकर यांच्या खबरीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता.24) रोजी आशुतोष पाथ्रीकर हा बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली. त्याचा शोध सुरू असताना रविवारी (ता.26) रोजी आशुतोष याचा मृतदेह कायगाव येथील गोदावरी नदी पात्रात मिळून आला. या घटनेमुळे वाळूज परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून मित्रमंडळीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
