वाळूज महानगर –
विदेशी दारूचा साठा ठोक विक्रीच्या उद्देशाने संगनमताने साठवून, बाळगून असतांना राज्य उत्पादन शुल्क ड विभागाच्या पथकाने छापा टाकून दोन आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून 62 लाख 14 हजार रुपयांचा विदेशी दारूचा साठा ट्रकसह जप्त केला. ही कारवाई पैठण रोडवरील इसारवाडी येथे शनिवारी 27 आगस्ट रोजी करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क निरिक्षक शहाजी शिंदे यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन शनिवारी 27 आगस्ट रोजी विठ्ठलनगर, जाजुनगर, इसारवाडी ता. पैठण येथे छापा मारला असता तेथे प्रकाश काकासाहेब साबळे (27), व रौनक अंकुश मुळे (23) दोघेही रा. इसारवाडी, ता. पैठण यांनी संगनमताने विदेशी दारूचा साठा ठोक विक्रीच्या उद्देशाने रॉयल चॅलेंज व्हिस्की 180 मि.ली. क्षमतेचे 30 खोके साठवून, बाळगून असतांना मिळून आले. हे विदेशी दारुचे खोके, बाटल्या कोठून आणले याबाबत विचारले असता त्यांनी ते इसारवाडी ता. पैठण येथील औरंगाबाद रोडवर उभे असलेल्या अशोक लेलैंड ट्रक (एम एच 20, डी ई -7325) मधून घेतल्याचे सांगितले. या माहितीनुसार तात्काळ त्या ट्रकचा शोध घेतला असता तो पैठण औरंगाबाद रोडवरील इसारवाडी शिवारात उभा असल्याचे दिसले. त्याची सखोल तपासणी केली असता तो युनायटेड स्पिरीट लि. चिकलठाणा, औरंगाबाद या विदेशी मद्य निर्मिती कारखान्यातून बुधवार 24 ते 26 आगस्ट दरम्यान असलेल्या वैध वाहतूक पासवर निघाल्याचे स्पष्ट झाले. या ट्रकचा मार्ग नगर -दौड -कोल्हापूर असा असतांना तो औरंगाबाद पैठण रोडवरील इसारवाडी शिवार येथे संशयीतरित्या सापडला. या ट्रकतील दारुच्या खोक्यांची मोजणी केली असता त्यात डायरेक्टर्स स्पेशल ब्लॅक डीलक्स व्हिस्की 180 मि.ली. क्षमतेचे 150 खोके, डायरेक्टर्स स्पेशल ब्लॅक डीलक्स व्हिस्की 375 मि.ली. क्षमतेचे 50 खोके, डायरेक्टर्स स्पेशल ब्लॅक डीलक्स व्हिस्की 750 मि.ली. क्षमतेचे 150 खोके, डायरेक्टर्स स्पेशल ब्लॅक डीलक्स व्हिस्की 2000 मि.ली. क्षमतेचे 150 खोके, डायरेक्टर्स स्पेशल व्हिस्की 180 मि.ली. क्षमतेचे 50 खोके, रॉयल चॅलेंज व्हिस्की 280 मि.ली. क्षमतेचे 170 खोके होते. यात एकूण विदेशी दारुचे 720 खोके आढळून आले. परंतु वाहतूक पासनुसार या ट्रकमध्ये 750 दारूचे खोके असणे आवश्यक असतांना त्यातीलच 30 खोके हे अवैधरित्या वाहन चालकाने विक्रीसाठी काढल्याचे दिसून आले. त्यामुळे या पांढऱ्या रंगाच्या अशोक लेलेंड ट्रक (एम एच 20, डी ई-7325) सह एकूण 62 लाख 14 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील आरोपींना विचारणा केली असता ही दारू विकास काकासाहेब साबळे (वाहनचालक, वय 24) रा. इसारवाडी ता. पैठण याने 30 खोके विठ्ठलनगर, जाजुनगर, इसारवाडी ता. पैठण येथे आम्हाला काढून ठेवल्याचे त्यांनी कबुल केले. ही दारू अवैधरित्या गणेश उत्सवाच्या कालावधी मध्ये ढाब्यांवर विकण्याचे नियोजन होते. असेही आरोपींनी सांगितले.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क, विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, जिल्हा अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्क ड विभागाचे निरीक्षक शहाजी शिंदे, दुय्यम निरीक्षक एस. के. वाघमारे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुभाष गुंजाळे, नवनाथ घुगे, जवान राहुल बनकर, विनायक चव्हाण व हर्षल बारी यांच्या पथकाने केली. पुढील तपास शहाजी शिंदे हे करीत आहे.