वाळुजमहानगर, (ता.15)- डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या तज्ञ समितीवर बजाजनगर येथील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो डॉ संजय सांभाळकर यांची नियुक्ती बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने मातंग समाजाच्या विकासासाठी गठीत केलेल्या लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या मान्य करण्यात आलेल्या शिफारशींची अंमलबजावणी शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याच्या दृष्टीने अभ्यास व कृती अहवाल तयार करण्यासाठी ही तज्ञ समिती कार्य करणार आहे. डॉ सांभाळकर हे दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग प्रमुख व उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक, अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राचे संचालक, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक व विविध समित्यावर कार्य केल्याचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. मातंग समाजाच्या प्रश्नांची जाण असणारा अभ्यासक म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जाते. त्यांच्या या नियुक्तीबद्दल डॉ सांभाळकर यांचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.