वाळूजमहानगर – शाळा सुटल्यानंतर सिटी बसमधून बजाजनगर येथे घरी येत असलेला नववीतील मुलगा मित्रांना हाक मारण्यासाठी डोकावला. त्याचवेळी त्याचे डोके खांबाला धडकले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना सोमवारी (ता.10) ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास औरंगपुऱ्यात घडली.
बजाजनगर येथील साई श्रद्धा पार्क या हाऊसिंग सोसायटीत राहणारा हरीओम राधाकृष्ण पंडित (14), हा सरस्वती भुवन शाळेत नववीत शिकत होता. तो बजाजनगर येथून दररोज शहरात सिटी बसने ये जा करत असे. सोमवारी (ता.10) रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास दुपारी शाळा सुटल्याने तो जिल्हा परिषद मैदानावरून स्मार्ट सिटीबसने (एमएच 20, -9862) मध्ये बसून बजाजनगरकडे निघाला. मात्र त्याचे काही मित्र मागे होते. बस निघाल्याने हरिओम हा खिडकीतून डोके बाहेर काढून हाक मारत असताना अचानक बाहेरील भिंत व खांब डोक्याला लागली. त्यामुळे हरिओम रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध झाला. त्याला चालक – वाहक व प्रवाशांनी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्याचे वडील लघु उद्योजक असून त्यांचे मुळगाव जनेफळ ता. जाफ्राबाद जि. जालना आहे. तो एकुलता एक असल्याने सोसायटीमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.या अपघाताची नोंद क्रांतीचौक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
काळजी न घेतल्याने झाला अपघात –
बस मध्ये बसल्यानंतर शरीराचा कोणताही अवयव बाहेर काढण्यास मनाई आहे. तसे फलकही बस मध्ये नेहमी आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे एखादा प्रवासी जर हात बाहेर काढत असेल, डोकावत असेल तर चालक आणि वाहक यांनीही त्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र या अपघातात तसी काळजी न घेतल्याने हा अपघात घडला. त्यामुळे बस किंवा कोणत्याही वाहनांमधून प्रवास करताना नेहमी काळजी घ्यावी.