
वाळुज महानगर, (ता. 6) – गंगापूरकडे जाणारी एसटी महामंडळाची बस व पुण्याकडून बिडकीनकडे जाणारा मालवाहू कंटेनर यांच्यात जोराची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनाचा चक्काचूर झाला. छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्ग वरील ईसारवाडी फाट्यावर बुधवारी 6 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात 9 ते 10 प्रवासी जखमी झाले. जखमी पैकी 2 जण गंभीर आहेत.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, एसटी महामंडळाची व गंगापूर आगारची बस (एम एच 14, बी टी – 3042) ही छत्रपती संभाजीनगरकडून गंगापूरकडे जात होती. तर मालवाहू कंटेनर (के ए 38, ए- 61 66) ही पुण्याकडून बिडकीन कडे जात होता. ही दोन्ही वाहने एकाच वेळी इसारवाडी फाट्यावर आली.
त्यातील मालवाहू ट्रक हा बिडकीनकडे वळण घेत होता. तर एसटी महामंडळाची बस सरळ गंगापूरकडे जात होती. दोन्हीही वाहनधारकांनी वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याने ट्रक व बस समोरासमोर धडकली. हा अपघात 6 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावर झाला.
या अपघातात बस चालक अनिल सुभाष वाकचौरे (वय 38) रा.संगमनेर यांच्यासह प्रवासी गीता विजयकांत गायकवाड (वय 53) रा. संभाजीनगर, सायली वल्ली (वय 24) रा.अहिल्यादेवीनगर, मनोहर गव्हाणे (वय 31) शेवगाव, राज गिरी (वय 22) रा.हिंगोली, संदीप सुधाकर दहिभाते (वय 38) रा.अमरावती, पूजा असणारे (वय 22) रा.संभाजीनगर, प्रशांत संजय जाधव (वय 25) रा.संभाजीनगर व अन्य दोन असे दहा जण जखमी झाले.
जखमींना रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी नानिज धामच्या विनामूल्य ॲम्बुलन्सचे पायलट संदीप त्रिंबके यांनी जिल्हा रुग्णालय (घाटी) येथे दाखल केले. या अपघाताची नोंद वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कंटेनर व बस या दोन्हीही वाहनांच्या समोरील भागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
