
वाळूजमहानगर (ता.16) – वाळुज परिसरातील सर्व परिचित असलेले पाटोदा -गंगापूर (नेहरी) ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच बबनराव सखाराम पाटील पेरे रा. पाटोदा यांचे मंगळवारी (ता.14) रोजी सायंकाळी 7 वाजता दीर्घ आजाराने वयाच्या 63 व्या वर्षी निधन झाले.
बबनराव पेरे पाटील यांनी पाटोदा गावचे उपसरपंच म्हणून काम केले आहे. ते दीर्घकाळ काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष राहिले. सध्या ते भाजप कामगार मोर्चा आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत होते. पाटोदा गावाच्या विकासात त्यांचा मोठा मोलाचा वाटा आहे. त्यांनी शुद्ध पाणी मिळावे म्हणून पाण्याची टाकी गावाला बांधून दिली होती व मंदिरासाठी आणि इतर कामासाठीही वैयक्तिक स्वरूपाचा निधी उपलब्ध करून दिला होता. तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात ते सामाजिक काम करणारा नेता म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याने पाटोदा गावाची मोठी हानी झाली. अशी प्रतिक्रिया पाटोदाचे विद्यमान उपसरपंच कपिल पेरे यांनी दिली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई, नातवंड असा परिवार आहे.
