March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.2) – वाळूज औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या बनावट चलनी नोटांच्या छापखाण्यावर अहिल्यानगर पोलिसांनी छापा टाकून पर्दाफास केला. यावेळी पोलिसांनी नोटा छापण्याचे साहित्य व नकली नोटा असा सुमारे 88 लाखाचा मुद्देमाल जप्त करून यातील 7 आरोपींना जेरबंद केले. मात्र एक मुख्य सूत्रधार फरार आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की 27 जुलै रोजी नगर तालुका पोलीस स्टेशनचे सपोनि प्रल्हाद गिते हे नगर तालुका पोलीस स्टेशन चे हद्दीत पेट्रोलींग करत असताना त्यांना माहिती मिळाली की, दोन इसम एक काळ्या रंगाचे महिंद्रा थार गाडीमध्ये फिरत असुन त्यांच्याकडे पाचशे रुपये दराच्या बनावट चलनी नोटा आहेत आणि ते आंबीलवाडी शिवारात प्रत्येक पान टपरीवर देवुन सिगारेट खरेदी करत आहेत. त्यावर सपोनि गिते यांनी आपल्या सहकार्यांसह आंबीलवाडी शिवारात जावुन खात्री केल्यावर तेथे दोन संशयीत इसम एक महिंद्रा थार गाडीमध्ये फिरताना दिसले. त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता निखील शिवाजी गांगर्डे वय 27 रा. कुंभळी ता कर्जत जि. अहिल्यानगर, सोमनाथ माणिक शिंदे वय 25 रा. तपोवन रोड जि. अहिलयानगर अशी त्यांची नावे व पत्ते मिळाले. त्यांची सखोल चौकशी करुन झडती घेतील असता 80 रुपयांच्या पाचशे रुपये दराच्या बनावट चलनी नोटा मिळाल्याने त्यांच्यावर नगर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्यास संहिता 2023 चे कलम 179,180,3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास करता बीड जिल्ह्यातुन प्रदिप संजय कापरे वय 28 रा. तिंतरवणी ता. शिरुर कासार जि. बीड तसेच संभाजीनगर मधुन मंगेश पंढरी शिरसाठ वय 40 रा. शिवाजीनगर ता. जि. छत्रपती संभाजीनगर, विनोद दामोधर अरबट वय 53 रा. सातारा परिसर ता. जि. छत्रपती संभाजीनगर, आकाश प्रकाश बनसोडे वय 27 रा. निसर्ग कॉलनी पेठेनगर ता.जि. छत्रपती संभाजीनगर, अनिल सुधाकर पवार वय 34 रा. मुकुंदनगर ता.जि. छत्रपती संभाजीनगर, अंबादास रामभाऊ ससाणे रा. शहर टाकळी ता. शेवगाव जि. अहिल्यानगर (फरार) असे आरोपी निष्पन्न झाले. त्यांच्याकडुन 59 लाख 50 हजार रुपयांच्या पाचशे रुपये दराच्या तयार बनावट चलनी नोटा, 2 कोटी 16 लाख रुपये किमतीचे बनावट नोटा तयार करण्याचे कागद व शाई आदी 27 लाख 90 हजार 600 रुपये बनावट नोटा तयार करण्याचे मशिन, संगणक असे साहित्य जप्त करण्यात आले.


यांनी केली कामगिरी –
ही कामगिरी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, भरत धुमाळ तसेच पोहेकॉ. सुभाष थोरात, पोहेकॉ. रविकिरण सोनटक्के, पोहेकॉ. बाबासाहेब खेडकर, पोहेकॉ. मंगेश खरमाळे, पोहेकॉ. शरद वांढेकर, पोहेकॉ. खंडु शिंदे, पोकॉ. सागर मिसाळ, पोकॉ. राजु खेडकर, पोकॉ. विक्रांत भालसिंग, पोकॉ. अदिनाथ शिरसाठ, पोका. अन्सार शेख तसेच मपोहेकॉ. मोहिनी कर्डक, पोकॉ. नितीन शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *