
वाळूजमहानगर, (ता.24) – शहीद भगतसिंह हायस्कूल बजाजनगर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शहीद भगतसिंग हायस्कूलचे मुख्याध्यापक गौतम शिंदे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी प्रवीण कुंभार (मॅनेजर बजाज ऑटो औरंगाबाद), संतोष घाळ (सीए) व डॉ. निलेश साठे (बालरोग तज्ञ) हे उपस्थित होते. तसेच शिक्षक प्रदीप प्रतिनिधी महादेव लाखे व रामा चोपडे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रथम शहीद भगतसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. दहावी परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा. या निर्णायक वळणावर करिअरच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यावश्यक असते. प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना अपेक्षेएवढे गुण मिळतातच असे नाही. कमी गुण मिळूनही करिअरच्या विविध वाटा कोणत्या, एखादे क्षेत्र निवडताना त्याबद्दलची माहिती कशी मिळवावी. यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रवीण कुंभार यांनी ऑटोमोबाईल इंडस्ट्री व अभियांत्रिकी शाखेमध्ये करिअर करण्यासाठी भविष्यातील नवनवीन संधी व त्या दृष्टीने आवश्यक क्षमता याविषयी मार्गदर्शन केले. सीए संतोष घाळ यांनी फायनान्स सेक्टर, अकाउंटिंग, एलआयसी, बँकिंग, इन्व्हेस्टमेंट, कर सल्लागार व जीएसटी या क्षेत्रातील करिअरच्या संधी विषयी मार्गदर्शन केले. डॉ. निलेश साठे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी व नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी आतापासूनच सखोल अभ्यास करण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले.
आपली आवड व क्षमता या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन करिअरची योग्य निवड कशी करावी? करिअरच्या अवघड टप्प्यांवर कोणत्या गोष्टींचा विचार करावा? कमी गुणांतील करिअरचे विविध पर्याय कोणते? या विषयांवर करिअर समुपदेशक मार्गदर्शन केले तसेच दहावी बोर्ड परीक्षेची तयारी, कॉफी मुक्त परीक्षा व परीक्षा कालावधीतील ताण तणावाचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन शहीद भगतसिंह हायस्कूलचे मुख्याध्यापक गौतम शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणात केले. कार्यक्रमास वर्षा जाधव, महादेव लाखे, वैभव ढेपे, रोहिणी पवार, भरत बोडखे, शहाजी भुकन, जितेंद्र बरंजाळेकर, सुनंदा गायकवाड, सोनल पाटील, हरिश्चंद्र गवळी गोपाल आधाने, आतिश डोईफोडे, आशिष मात्रे, अंबिका साळवे, प्रकाश वाघ, विनोद मस्के ,राहुल साबळे, शैलेंद्र रसाळ, भाऊसाहेब कोळी आदी शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी उपस्थित होते. आर. बी.चोपडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.
