
वाळुज महानगर, (ता.9) – बजाजनगर येथील दगडोजीराव देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये सोमवारी 8 सप्टेंबर 2025 रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने बजाजनगर मध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 
बजाजनगर येथील दत्त मंदिर व जागृत हनुमान मंदिर परिसरामध्ये रासेयो स्वयंसेवकांनी जाऊन साक्षरतेचा संदेश दिला. यासाठी पोस्टर्स बनविण्यात आले होते, काही घोषवाक्य ही तयार करण्यात आले होते, आणि चित्राच्या माध्यमातून साक्षर आणि निरक्षर यामधील अंतराचा संदेश विद्यार्थ्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचविला. याचबरोबर उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढावे विशेष म्हणजे मुलींना उच्च शिक्षणातील संधी निर्माण करून द्याव्यात, ‘शिकलेली आई घरदार पुढे नेई’ या म्हणीप्रमाणे मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. एकंदरीत देशाचेही उच्च शिक्षणातील प्रमाण 6 टक्के असून प्रगत देशांमध्ये 56 टक्के पर्यंत आहे, म्हणून आपल्या देशांमधील उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. यासाठी समाजातील सर्व स्तरातून प्रयत्न होणे आवश्यक आहे. असा संदेश यावेळी विद्यार्थ्यांनी दिला. 
यावेळी प्राचार्य डॉ. राहुल हजारे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करून दिली. हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ सिंधू हळदे, डॉ. रमेश जायभाये आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आयोजित केला होता.
