February 5, 2026

 


वाळूजमहानगर, (ता.23) – शहीद भगतसिंह हायस्कूल बजाजनगर येथील विद्यार्थ्यांनी विविध गणितीय प्रयोगाचे प्रदर्शन करून गणितीय ज्ञानाचे महत्व विषद करत राष्ट्रीय गणित दिन अनोख्या पद्धतीने गुरुवारी (ता.22) डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गौतम शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील ज्येष्ठ गणित शिक्षक महादेव लाखे, आशिष मात्रे हे पस्थित होते.


या प्रदर्शनामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी गणितीय प्रयोगामध्ये पायथागोरस प्रमयाचे साहित्य, त्रिमितीय वस्तूचे साहित्य, त्रिकोणमितीय साहित्य, चौकोनाच्या गुणधर्माचे साहित्य, त्रिकोणाच्या गुणधर्माचे साहित्य, वर्तुळाच्या गुणधर्माचे साहित्य, समांतर रेषेवरील कोणाचे साहित्य, मापन पद्धती, विस्तार सूत्रे, पाढे, वर्तुळ थाली आलेख आदी साहित्याचे प्रदर्शन मांडण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात शाळेचे मुख्याध्यापक गौतम शिंदे यांनी सांगितले की, राष्ट्रीय गणित दिनाचे महत्त्व प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे, हा दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे मानवतेच्या विकासासाठी गणिताचे महत्त्व लोकांमध्ये जागरुकता वाढवणे हा आहे. तसेच प्रमुख पाहुणे व ज्येष्ठ गणित शिक्षक महादेव लाखे यांनी सांगितले की, दरवर्षी भारतामध्ये 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महान भारतीय गणितीतज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. 22 डिसेंबर 2012 रोजी भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी या दिवसाची घोषणा केली. श्रीनिवास रामानुजन यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. प्राचीन काळापासून, आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, महावीर, भास्कर दुसरा, श्रीनिवास रामानुजन इत्यादींसारख्या गणितात विविध विद्वानांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. अगदी लहान वयात, श्रीनिवास रामानुजन यांनी एक विशिष्ट प्रतिभा दाखवली. अनंत मालिका, संख्या सिद्धांत, गणितीय विश्लेषण आदी अनेक उदाहरणे त्यांनी मांडली आहेत. तसेच प्रमुख पाहुणे आशिष मात्रे या गणितीय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गणिताचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *