
वाळूज महानगर –
बजाजनगर येथील वाढती लोकसंख्येमुळे दररोज मोठ्या प्रमाणात केर कचरा निघतो. या कचऱ्याचे व्यवस्थापन नसल्यामुळे ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढीगचढीग साचतात. त्यामुळे येथील आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. या ढिगाराच्या नियंत्रणासाठी मुख्य चौकात व ठीकठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात याव्या. अशी मागणी वडगाव (को.) बजाजनगर ग्रामपंचायतला दिलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

वडगाव (को.) -बजाजनगर ग्रामपंचायतचे प्रशासक दिपक बागुल यांना नागरिकांच्या वतीने दिलेले या निवेदनात असे म्हटले आहे की, बजाजनगर हा मोठा कामगार वर्ग असलेला रहिवाशी भाग असून या भागामध्ये बहुतांश कुटुंब व बॅचलर कामगार हे 12-12 तास म्हणजे सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत नौकरी करतात. तसेच वाळूज परिसरात मोठमोठे कॉलेज, शाळा असून या ठिकाणी विद्यार्थी वर्गही मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय बजाजनगर भागातील भाजी मंडई ही दुपारी 4 ते रात्री उशिरापर्यंत सुरु असते. या भाजी मंडईतून निघणाऱ्या केरकचर्यासह रहिवासी क्षेत्रातील कचरा टाकण्यासाठी गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिक कुठेही कचरा फेकून देतात. परिणामी कचऱ्याचे ढीगचढीग साचतात. त्यातून दुर्गंधी सुटते, शिवाय मोकाट जनावरांचाही त्यावर सुळसुळाट असतो. त्यामुळे या परिसरात रोगराई वाढण्याची शक्यता आहे. यावर पर्याय म्हणून मुख्य चौकासह वेगवेगळ्या महत्वाच्या ठिकाणी सार्वजनिक कचरा कुंड्या ठेवून जनसामान्याची कचरा टाकण्यासाठीची होणारी गैरसोय ग्रामपंचायती व एमआयडीसीच्या वतीने ठेवण्यात याव्या. तसेच कायमस्वरूपी कचरा व्यवस्थापनासाठी योग्य तो पर्यायीमार्ग काढून तात्काळ कचराची समस्या सोडवण्यात यावी. असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर रामेश्वर नवले, सोनाली शिंदे, रत्नमाला सावळे, स्वाली लिहिणार, अर्चना गोरगिक, संगिता शिंदे, सोनाली पवार, सविता नाईक, कांचन कदम, कविता सोनके, मनिषा निकम, वैशाली पाटील आदींची नावे व सह्या आहेत.
फोटो ओळ – बजाजनगर येथील विविध चौकात कचराकुंड्या ठेवण्याबाबत वडगाव (को.) ग्रामपंचायतचे प्रशासक दिपक बागुल यांना निवेदन देताना रामेश्वर नवले संजय निकम आदी.