
वाळूजमहानगर, (ता.20) – प्रतिवर्षी प्रमाणे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचा 730 वा समाधी संजीवन सोहळा वाळूज महानगरातील श्री जागृत हनुमान मंदिर आर एक्स सेक्टर बजाजनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त 21 ते 23 जुलै तीन दिवस विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
श्री संत सावता माळी मित्र मंडळ बजाजनगरच्या वतीने गेल्या 30 वर्षांपासून हा सोहळा आयोजित करण्यात येत आहे. जागृत हनुमान भजनी मंडळ, सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या विशेष सहकार्याने हा सोहळा होणार असून कामिका एकादशी निमित्त सोमवारी 21 जुलै रोजी रात्री 8 वाजता व मंगळवारी सकाळी 10 वाजता संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त ह.भ.प. गुरुवर्य प्रेममूर्ती नामदेव महाराज चारठाणकर यांचे हरिकीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसाद वितरीत करण्यात येणार आहे. श्री संत शिरोमणी सावता महाराज समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त बुधवार 23 रोजी सकाळी 8 वाजता संत सावता महाराज मूर्तीस महाभिषेक व प्रतिमा पूजन करण्यात येणार असून सकाळी 10 वाजता ह. भ.प. रामेश्वर महाराज शिंदे रामायणाचार्य सातगावकर जि. बुलढाणा यांचे संत सावता महाराज जिवन चरीत्राविषयी हरि किर्तन होईल. महाप्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री संत सावता माळी मित्र मंडळ वाळूज महानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
