वाळूज महानगर, (ता.9) – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना कार्यकारिणी निवडीत निष्ठावंतांना डावलून पक्षात नव्याने प्रवेश घेणाऱ्यांना महत्त्वाचे स्थान दिले. त्यामुळे पूर्वीपासून एकनिष्ठ राहिलेल्या पदाधिकारी व शिवसैनिक यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे. त्याचाच परिणाम म्हणून बजाजनगरचे माजी सरपंच तथा पक्षाचे नवनिर्वाचित तालुका समन्यवक तथा उपतालुकाप्रमूख सचिन गरड यांनी आपल्या पदाचा सोमवारी (ता.9) रोजी राजीनामा दिला आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (शिवसेने) च्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यात बजाजनगरातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. विशेष म्हणजे गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवस्सेनेला जय महाराष्ट्र करत ज्या पदाधिकाऱ्यांनी भाजपाला साथ देत शिवसेनेला ग्रामपंचायतच्या सत्तेपासून वंचित ठेवले. ते पदाधिकारी शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे गटात सहभागी न होता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेत आले. अशा आयाराम-गयाराम कार्यकर्त्यांची वर्णी पदाधिकार्यात लावण्यात आली. परिणामी निष्ठावंत पदाधिकार्यात नाराजीचे वातावरण पसरले आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता पक्षाशी एकनिष्ठ राहूनसुद्धा त्यांना डावण्यात आले. किंबहुना त्यांना कमी दर्जाचे पदे देण्यात आले. त्यामुळे निष्ठावंत पदाधिकारी व शिवसैनिक यांच्यात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.
त्याचाच परिणाम म्हणून. वडगाव-बजाजनगरचे माजी सरपंच तथा उपतालुकाप्रमूख सचिन गरड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच नवनिर्वाचित पश्चिम तालुका समन्वयकहे पद न स्वीकारता सचिन गरड यांनी वैयक्तीक कारण पुढे करत नवीन पदाचा व उपतालुकाप्रमूख पदाचा राजीनामा शिवसेना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांच्याकडे दिला आहे. याबाबत सचिन गरड यांनी सांगितले की, मी निष्ठावंत शिवसेनेचा कार्यकर्ता असून इतर पक्षात न जाता शिवसेनेतच सामान्य शिवसैनिक म्हणून काम करणार आहे.