February 5, 2026


वाळुज महानगर- ग्रामीण भागातील जनतेला बँकेशी जोडण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने आर्थिक समावेशाद्वारे सक्षमीकरण ही मोहीम सुरु केली आहे 15 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणाऱ्या या योजनांसह बँकेच्या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे आवाहन महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे वाळूज शाखा व्यवस्थापक नितीन टेकाडे यांनी लांझी येथे शनिवारी (ता.15) रोजी केले.

वाळूज परिसरातील लांझी व पिंपरखेडा येथे आर्थिक समावेशाद्वारे सक्षमीकरण मोहीमेचा शुभारंभ शनिवारी (ता.15) रोजी करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र ग्रामीण बँक, वाळूज शाखेचे व्यवस्थापक नितीन टेकाडे यांनी या मोहिमेबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सरपंच निर्मला चांगदेव खोबरे, उपसरपंच सुमन नारायण पर्हाटे, ग्रामसेवक आबासाहेब कुंजर, जनार्थन भाउसाहेब नवले, दुध डेअरी चेअरमन जगन्नाथ नाईक, दुधडेअरी सचिव सतीश भवर, मंदिर समितीचे अध्यक्ष राजाराम खोबरे, ग्रामपंचायत सदस्या नर्मदाबाई पवार, तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष जनार्धन गांधीले, महाराष्ट्र ग्रामीण बँक वाळूज शाखेचे अधिकारी कल्पना रावले, संदिप भसळे, कर्मचारी संजय राऊत व गणेश साबळे आदींची उपस्थिती होती वाळूज परिसरातील लांची व पिंपरखेडा येथे झालेल्या या कार्यक्रमाचे आभार संजय राऊत यांनी मानले.

आर्थिक समावेशाद्वारे सक्षमीकरण मोहीम,
15 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार

केंद्रीय अर्थ मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील 854 ग्रामपंचायतींमध्ये 15 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर 2022 या कालावधीत प्रत्येक शनिवारी (22 ऑक्टोबर वगळून) आर्थिक समावेशद्वारे सक्षमीकरणाची मोहीम सुरू आहे.
या मोहिमेत प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये बचत खाते उघडणे, बचत खात्याला आधार व मोबाईल क्रमांक जोडणे, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना व अटल पेन्शन योजनेमध्ये समाविष्ट करून घेणे यांचा अंतर्भाव असणार आहे. त्यासोबतच विना कॉर्पोरेट, कृषी संलग्न, लघु अथवा सूक्ष्म उद्योगांसाठी विनातारण रुपये दहा लाखापर्यंतच्या मुद्रा कर्जाची सुविधा, तसेच पशुपालन व मत्स्यव्यवसायिकांसाठी रुपये दोन लाखापर्यंतची किसान क्रेडिट कार्ड मार्फत कर्ज सुविधा यांचा सुद्धा समावेश असणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व महिला बचत गटांना कर्ज व बचत गटातील महिलांना बँकेच्या विविध योजनांमध्ये समाविष्ट करून घेणे व केंद्र सरकार व नाबार्डच्या इतर योजना जसे की कृषी पायाभूत सुविधा, वैयक्तिक सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग व शेतकरी उत्पादक कंपनी योजना यांचा सुद्धा प्रचार व प्रसार होणार आहे. या मोहिमेसाठी ग्रामपंचायत स्तरावर ठरलेल्या वेळापत्रकानुसार बँकेचे स्टॉल या सर्व योजनांच्या माहितीपत्रिकेसोबत सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये उपलब्ध असणार आहेत.
ही मोहिमेला यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी, औरंगाबाद सुनील चव्हाण यांच्या आदेशानुसार तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील सर्व सरकारी यंत्रणा यामध्ये सहभागी होणार आहेत. सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी गाव पातळीवर यासाठी विशेष मोहीम राबवून आपल्या कार्यक्षेत्रातील बँकांना सर्वतोपरी सहकार्य करावे. अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *