
वाळूजमहानगर, (ता.21) – मंदिरात पूजेसाठी फुले तोडण्यासाठी घराच्या धाब्यावर गेलेल्या महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना नायगावजवळील बकवालनगर कामगार वसाहतीत बुधवारी (ता. 21) रोजी सकाळी घडली.
यबाबत मिळालेली माहिती अशी की, सुनैनादेवी अनिल पंडित (वय 35), रा. बकवालनगर, नायगाव या धार्मिक वृत्तीच्या होत्या आणि दररोज मंदिरात जात असत. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्या फुले तोडण्यासाठी धाब्यावर गेल्या. मात्र, रात्री पडलेल्या पावसामुळे धाब्यावर पाणी साचले होते आणि त्यात विद्युत प्रवाह उतरलेला होता, याची कल्पना सुनैनादेवींना नव्हती.
फुले तोडताना त्या साचलेल्या पाण्यात आल्याने त्यांना जोराचा विजेचा धक्का बसला व त्या जागीच कोसळल्या. पती अनिल पंडित धावत आले असता त्यांनाही विजेचा धक्का बसला. प्रकार लक्षात येताच त्यांनी पत्नीला तातडीने बजाजनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. सुनैनादेवी यांचे पार्थिव त्यांच्या मूळगाव बिहारमधील छपरा जिल्ह्यातील बलदिहा येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. या दुःखद प्रसंगी युवासेनेचे तालुका युवाधिकारी रमेश आरगडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल वाघ तसेच स्थानिक नागरिकांनी मोठी मदत केली.
